खाजगी जागेतील होर्डिंग धारकांना न्याय मिळवून देवू -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मनपा जागेतील होर्डिंग घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन ; नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनने दिले निवेदन
नाशिक,दि,१२ फेबुवारी २०२४ –नाशिक महानगरपालिकेच्या जाहिरात व परवाने विभागातून महापालिका हद्दीतील मनपा मालकीच्या खुल्या २८ जागांवर जाहिरात फलक उभारणीची निविदा काढण्यात आली होती. मात्र निविदा, कार्यादेश व करारनामा यात मोठी तफावत असुन कार्यादेशात मक्तेदारास फायदेशीर होतील असे अनेक बदल करून त्या माध्यमातून कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा आरोप नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनने केल्यानंतर त्यासंबंधी आयुक्तांनी चौकशी समिती गठीत केली असून समितीकडून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी असोसिएशनच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेत निवेदन देऊन केली आहे. तरी या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे होईल व तुम्हाला न्याय मिळेल असे आश्र्वासन यावेळी फडणवीस यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
मनपाच्या जाहिरात व परवाने विभागाने दहा वर्षासाठी नाशिक शहरातील विविध खुल्या जागांवर २८ ठिकाणी जाहिरात फलक लावण्यासाठी जानेवारी २०२२ ला निविदा प्रक्रिया राबविली होती. यात काम मिळालेल्या मार्कविस ॲडव्हर्टायझिंग अँण्ड मार्केटिंग या कंपनीला काम मिळाल्यानंतर जाहिरात व परवाने विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करून निविदा, कार्यादेश व करारनामा यात मक्तेदारास फायदेशीर होतील असे अनेक अटी, शर्ती बदलून कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा आरोप असोसिएशनने केलेला आहे. यानंतर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सीमा हिरे यांची भेट घेत निवेदन दिले देत आपली कैफियत मांडून चौकशीची मागणी केली होती.
त्यानंतर सर्वांनी मनपा आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले व आयुक्तांनी तातडीने चार अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली असुन समिती याबाबत चौकशी करीत आहे. यातील चौकशी निष्पक्ष व्हावी याकरिता नाशिकच्या आमदार, खासदारांनी मनपा आयुक्तांना लेखी आदेश दिले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर असतांना असोसिएशनच्या वतीने त्यांना देखील याबाबत प्रत्यक्ष भेट घेत निवेदन दिले असून असोसिएशनकडून देखील या घोटाळ्याबाबतचे पुरावे चौकशी समितीला देण्यात येणार आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम कदम, माजी अध्यक्ष मच्छिंद्र देशमुख, उपाध्यक्ष इम्तियाज अत्तार, सरचिटणीस गणेश बोडके, विष्णुपंत पवार, रवि शिरसाठ, निखिल सुराणा, बंटी धनविजय, विराज पवार व पदाधिकारी उपस्थित होते. याबाबत समिती काय निर्णय घेते याकडे शहर वासियांचे लक्ष आहे.
माहितीच्या अधिकारात अनेक बाबी उघड
नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनने माहितीच्या अधिकारात निविदा संबंधी अनेक कागदपत्रे मागविले असुन यातून मार्कविस ॲडव्हर्टायझिंग यांनी मनपास उत्पन्न वाढीच्या नावाखाली अनेक गोष्टी मागितल्याचे दिसून येत आहे. यात २८ खुल्या जागेतील जाहिरात फलक उभारण्याचे काम असतांना मक्तेदाराने याहून अधिक फलक उभारल्याचे व आणखी १२६ फलकांसाठी जागा मागितल्याचे आढळून आले आहे. त्याबाबत मनपाने ३० ऑक्टोबर २०२३ रोजी १० अधिकाऱ्यांची समिती नेमून परवानगी देण्याची व मक्तेदारास येत असलेल्या अडचणी सोडविण्याचे आदेश दिले आहेत. तर मनपा आयुक्तांची असोसिएशनने घेतलेल्या प्रत्यक्ष भेटीत हा आदेश कधी झाला याबाबत खुद्द आयुक्तांनाच माहिती नसल्याचे दिसून आले.