मुंबई – तुझ्यात जीव रंगला मधील वहिनीसाहेब हि व्यक्तिरेखा अजूनही प्रेक्षक विसरले नाही. वहिनीसाहेबाचा धाक आणि दरारा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. वहिनीसाहेब हि भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेत पुन्हा एकदा नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला असून हि मालिका १५ ऑगस्ट पासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
या मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना धनश्री म्हणाली, “या मालिकेत माझ्या व्यक्तिरेखेचं नाव शिल्पी आहे, जी तिच्या माहेरी येऊन राहतेय आणि तिला सतत असं वाटतं कि तिच्या आयुष्यात जे काही चुकीचं घडलं त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त अश्विनी आहे. त्यामुळे शिल्पी अश्विनीला सतत घालून पडून बोलते, प्रत्येक गोष्टींमध्ये तिच्या चुका काढते जस प्रोमोमध्ये देखील प्रेक्षकांनी पाहिलं कि शिल्पी कशी तिच्या वहिनी अश्विनीला टोमणे मारते. अशा प्रकारची एक नकारात्मक भूमिका पुन्हा एकदा मी साकारतेय त्यामुळे जशी वहिनीसाहेब सगळ्यांच्या लक्षात राहिली तशीच शिल्पी देखील प्रेक्षकांच्या मनात घर करेल अशी मी आशा करते.”