जनस्थान आयकॉन पुरस्काराचे आज वितरण

ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते चिन्मय उदगीरकर ,अनिल दैठणकर, आनंद ढाकिफळे, सुरेश गायधनी, यांचा होणार सन्मान 

0

नाशिक,दि २२ जून २०२३ –नाशिकच्या सांस्कृतिक जीवनात आधुनिक साधनांच्या उपयोगाने नवीन पर्व सुरू करणाऱ्या ‘जनस्थान’ या व्हाट्सअप ग्रुपचा नववा वर्धापनदिन दिनांक १८ जून पासून नाशिकमध्ये साजरा होत आहे आज (दि.२२) सायंकाळी ६ वाजता जनस्थान आयकॉन पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते होणार आहे .अशी माहिती ग्रुपचे प्रमुख अभय ओझरकर यांनी दिली.

व्हायोलिन वादक अनिल दैठणकर, चित्रकार आनंद ढाकिफळे, ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सुरेश गायधनी आणि अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते चिन्मय उदगीरकर यांना यंदा सन्मानित करण्यात येणार आहे.

‘जनस्थान’हा व्हाट्सअप ग्रुप दरवर्षी आपला वर्धापनदिन अनोख्या पद्धतीने साजरा करतो. यंदाही हा सात दिवस चालणारा उत्सव नाशिकमध्ये साजरा होत असून यात आज दि. २२ रोजी सायंकाळी सहा वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या सोहळ्यासाठी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सिने, नाट्य अभिनेते प्रमोद पवार येणार असून त्यांच्या ज्ञानाला आणि अनुभवांना ऐकण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.

नाशिकच्या सांस्कृतिक कला जीवनामध्ये आपल्या कलेच्या सेवेतून योगदान देणाऱ्या देणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. यंदा ज्येष्ठ व्हायोलिन वादक आणि पद्मविभूषण एन्. राजन यांचे शिष्य अनिल दैठणकर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. आजवर विविध कार्यक्रमांमध्ये व्हायोलिनची साथसंगत करण्याबरोबरच स्वतंत्रपणे व्हायोलिन या वाद्याच्या त्यांनी राज्यभर मैफली केल्या आहेत. त्यांचा स्वतःचा शिष्यवर्ग असून या वाद्याचा प्रचार-प्रसार करण्यात दैठणकर यांची कामगिरी मोलाची आहे.

आनंद ढाकिफळे एक अष्टपैलू कलावंत असून चित्रकला हा त्यांचा मुख्य विषय आहे. त्यासोबत जुन्या काळातील साईन बोर्ड, नाटकाचे नेपथ्य, शिल्पकला, चित्ररथ अशा प्रकारचे विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण काम त्यांनी केले असून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कामाचा ठसा उमटला आहे.

सुरेश गायधनी हे गेली ४० वर्ष नाटक या विषयासाठी काम करत असून अभिनय, दिग्दर्शन, प्रकाशयोजना यांबरोबरच राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे सन्माननीय परीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. राज्य सरकारच्या परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य, दीपक मंडळाचे अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषविली असून नाटक हा एकमेव ध्यास घेऊन त्यांची आजवरची वाटचाल झाली आहे.

चिन्मय उदगीरकर हे सध्याच्या मराठी चित्रपट, मालिका, नाट्य क्षेत्रातील नव्या पिढीतले अत्यंत दमदार नाव असून आपल्या अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती या कलेतील योगदानाबरोबरच गोदावरी शुद्धीकरण, पर्यावरण वाचवा चळवळ अशा सामाजिक मोहिमेतही ते अग्रेसर आहेत.

या चौघांनाही ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. यापूर्वीच्या जनस्थान सोहळ्यासही असेच मान्यवर प्रमुख पाहुणे लाभले होते. त्यात राजदत्त, मिलिंद गुणाजी, अशोक समेळ, अशोक बागवे आदी मान्यवरांचा समावेश आहे.

या संपूर्ण फेस्टीवलसाठी एकदंत फिल्म्स ,गोविंद  दंडे ॲंड सन्स,अशोका बिल्डकाँन,हॉटेल पतंग,हॉटेल सात्विक,हॉटेल पंचवटी ग्रुप यात्री,भूषण कोठावदे,शंतनू देशपांडे,श्रीराम गोरे,श्रीपद्मवती केटर्स ,सचिन गीते, रवी पवार ,यांचे विशेष सहकार्य लाभले आहे

त्यामुळे या अनोख्या महोत्सवाचा नाशिककरांनी आनंद घ्यावा असे आवाहन ग्रुपचे प्रमुख अभय ओझरकर यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.