नवी दिल्ली, १ एप्रिल,२०२५ – वयाची ७५ वर्ष झाल्यावर सत्तेच्या पदावर कुणी राहू नये हा नियम लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशींसह अनेकांना लागू केला. मग या नियमांच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का ? असा खरमरीत सवाल संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते.
पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, २०२९ ला कोण पंतप्रधान होणार हे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती नाही.२०१९ ला महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचा महाराष्ट्रात पराभव झालेला आहे. २०१९ ला नरेंद्र मोदी हे बहुमताचा आकडा गाठू शकलेला नाही. त्यानंतर गडबड घोटाळा करून विधानसभा जिंकले हे आख्ख्या जगाला माहित आहे. प्रश्न आहे नरेंद्र मोदी यांचा. स्वतः मोदी यांनी काही नियम केलेले आहेत. ते नियम त्यांना लागू नाही का? वयाची ७५ वर्ष झाल्यावर सत्तेच्या पदावर कुणी राहू नये हा मोदींनी केलेला नियम आहे. हा नियम लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशींसह अनेकांना लागू केला. मग या नियमांच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या नियमाची मान्यता होती. आणि याबाबत चर्चा करण्यासाठी ते संघाच्या कार्यालयात गेले होते. नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये वयाची ७५ वर्ष पूर्ण करत आहेत. आणि त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावं लागतं. देवेंद्र फडणवीसांनी कितीही बोलू द्या, हे ते ठरवणार नाहीत. असं ही खा. राऊत म्हणाले
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची मुदत संपलेली आहे. तरीही भाजप त्याचे शिखर पुरूष अध्यक्ष नेमू शकलेले नाही कारण अद्याप भाजपला अध्यक्ष नेमायचा आहे त्यात संघाची एक भूमिका आहे. आणि ती भूमिका त्यांना मान्य करावी लागेल असं संघाचं म्हणणं आहे ही आमची माहिती आहे. आता हे नाही म्हणतील पण आमची पक्की माहिती आहे. तसं नसतं तर ताबडतोब नेमला असता. पण नड्डांना मुदतवाढ दिली जातेय. पण पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत, काहीतरी शिजतंय. ते काय शिजतंय ते लवकरच कळेल असेही संजय राऊत म्हणाले.