नाशिक,२३ डिसेंबर २०२२ – गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने जानेवारी महिन्यात शेकोटी साहित्य कला संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून त्याच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक डॉ. शंकर बोऱ्हाडे यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ. शंकर बोऱ्हाडे हे गेली ४० वर्षे साहित्य क्षेत्रात सक्रिय असून त्यांचे मरणगाथा (कवितासंग्रह), कडा आणि कंगोरे (व्यक्तिचित्र संग्रह) उजेडा आधीचा काळोख (ललित) देशभक्त शेषराव घाटगे (चरित्र) विडीची गोष्ट (उद्योगाचे चरित्र) शोध डॉ वसंतराव पवारांचा, लोकपरंपरेचे सिन्नर ही संपादित पुस्तके प्रसिद्ध असून त्यांनी सार्वजनिक वाचनालयात विश्वस्त म्हणून काम केले आहे. ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजनात त्यांचा सहभाग होता. मराठीचे प्राध्यापक असणारे डॉ बोऱ्हाडे हे साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. त्यामुळे पहिल्या शेकोटी साहित्य कला संमेलनाचे अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली.
गिरणा गौरव प्रतिष्ठान सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या गुणवंतांच्या पाठीशी सतत उभे असते. या संमेलनात स्मिता पाटील साहित्यपेरा आणि अभिनेते निळूभाऊ फुले साहित्य गौरव पुरस्कार देऊन लेखकांना गौरविण्यात येणार आहे. या संमेलनाची जोरदार तयारी चालू असून लेखकांबरोबरच लोककला सादर करणाऱ्या कलावंतांचा सहभाग या संमेलनात असणार आहे. आदिवासी लोककलांचे सादरीकरण करण्याचा आयोजकांचा प्रयत्न असून साहित्य आणि लोककला यांचा अभूतपूर्व संगम नाशिककरांना या संमेलनात पाहायला मिळणार आहे. संमेलनासाठी नाशिक जिल्ह्यातील विविध सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक संस्थांचे सहकार्य मिळत असून हे संमेलन आगळे वेगळे ठरेल असा विश्वास सुरेश पवार यांनी व्यक्त केला आहे.