नाशिक,दि.२९ मे २०२३ –नागपूर,पुणे,अमळनेर येथील काही मंदिरात भाविकांना ड्रेसकोड बंधनकारक करण्यात आलेला आहे.त्यानंतर आता नाशिकजवळ सुप्रसिद्ध सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणार असाल, तर आता नवीन नियम असणार आहे. सप्तशृंगी मंदिरातही आता ड्रेसकोड लागू होणार आहे ? सप्तशृंगी गडावरील आदिमायेच्या मंदिरातही पावित्र्य जपण्यासाठी भाविकांना ड्रेस कोड लागू व्हावा, त्यासाठी विश्वस्त मंडळातील काही सदस्यांसह सप्तशृंगगड ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि भाविक सकारात्मक असून, लवकरच निर्णय घेण्याचे सूतोवाच सप्तशृंगगडचे सरपंच रमेश पवार,विश्वस्त ॲड.ललीत निकम आणि ग्रामस्थांनी केले आहे.
यानुसार दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी तोकडे, अंगप्रदर्शन करणारी अथवा उत्तेजक कपडे परिधान केल्यास त्यांना दर्शन घेता येणार नाही यावर विचार सुरु आहे.
गेल्या काही दिवसांपासून मंदिरामध्ये भाविकांसाठी ड्रेसकोडचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. काही दिवसांपूर्वी लाखो महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात प्रवेशासाठी ड्रेसकोड बंधनकारक करण्यात आला होता. मात्र काही तासांतच हा निर्णय मागे घेण्यात आला होता. आता याच धर्तीवर भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी देवी मंदिरात ड्रेस कोडचा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
वणी गडावर दर्शनासह इतरही अनेक पर्यटनस्थळे असल्यानं अनेक भाविक पर्यटनस्थळांना भेटी देत असतात.मात्र पर्यटनस्थळांबरोबरच धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी आलेले काही भाविक येताना तोकडे कपडे घालून येतात.त्यामुळे अशा भक्तांना आळा घालण्यासाठी सप्तशृंगगडावर भाविकांना ड्रेस कोड लागू करण्याबाबत सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त,ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ भाविक सकारात्मक, विचाराधीन असून लवकरच त्यावर निर्णय होईल,असे सूतोवाच विश्वस्तांनी व्यक्त केले आहे.