नाशिक, दि. २१ जुलै २०२५ – Dwarka Circle Underpass Nashik नाशिक शहरातील सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणी गणल्या जाणाऱ्या द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ८०० मीटरचा अंडरपास प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज पाहणी दौरा करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
या पाहणी दरम्यान छगन भुजबळ यांनी अंडरपास विकासासाठीचे नियोजन (Dwarka Circle Underpass Nashik), वाहतुकीचे मार्ग, सिग्नल यंत्रणा आणि वाहतूक नियंत्रण यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, अंडरपास निर्मिती करताना सर्व आवश्यक बाबींचा अभ्यास काटेकोरपणे व्हावा, तसेच वाहतूक पोलिसांना विशेष प्रशिक्षणही देण्यात यावे.
मुख्य अंडरपास सोबतच वडाळानाका येथे ३०० मीटरचा दुसरा अंडरपास तयार करण्यात येणार आहे. यामुळे नाशिकहून नाशिकरोडकडे जाणारी वाहने आणि धुळे दिशेची वाहतूक दोन्ही मार्ग सुलभ होणार आहेत.
या दौऱ्यात महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे कार्यकारी अभियंता इम्रान शेख, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, किरणकुमार चव्हाण, मनपाचे कार्यकारी अभियंता रवींद्र बागुल, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप खैरे, रवींद्र पगार, अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, आकाश पगार यांच्यासह अनेक अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.