वय आठ महिने, वजन अवघे साडेचार किलो SMBT हॉस्पिटलमध्ये चिमुकल्यावर‘ओपन हार्ट सर्जरी’

उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच झाली अशी शस्रक्रिया; बालकांच्या हृदयउपचारासाठी एसएमबीटीत मोफत उपचार

0

नाशिक दि ०८ ,ऑक्टोबर २०२२ – नाव आरुष. वय ८ महिने. वजन अवघे ४ किलो ४०० ग्रॅम. या चिमुकल्याला जन्मजात हृदयविकार असल्याचे निदर्शनास आले. एवढ्याशा जीवाला हृदयविकार समजताच कुटुंबियांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. यानंतर एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये या चिमुकल्याला दाखल करण्यात आले. वय, वजन कमी असताना गुंतागुंतीची शस्रक्रिया करण्याचे मोठे आव्हान येथील डॉक्टरांवर होते. हे आव्हान पेलत या चिमुकल्यावर नुकतीच यशस्वी शस्रक्रिया झाली असून त्यास रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे….

एवढ्या कमी वयात केलेली आव्हानात्मक अशी ही पहिलीच ‘ओपन हार्ट सर्जरी’उत्तर महाराष्ट्रात झाल्याचे येथील हृदयविकार तज्ञ डॉ. विद्युतकुमार सिन्हा यांनी सांगितले. अधिक माहिती अशी की, पालघर जिल्ह्यातील आणि वाडा तालुक्यातील नमन येथील आरुष वाघ या बालकास श्वास घेण्यास त्रास होणे, कपाळावर घाम येणे, स्तनपानाला प्रतिसाद न देणे, वजन न वाढणे, वारंवार श्वसनमार्गाचा संसर्ग होणे, न्यूमोनिया अशा तक्रारी होत्या.

एसएमबीटी हॉस्पिटलकडून सातत्याने ठाणे, पालघरसह नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. अशाच एका आरोग्य शिबिरात या बालकाची तपासणी करण्यात आली होती.

याप्रसंगी त्यास हृदयविकार असल्याचे निदर्शनास आले. या बालकाच्या हृदयाला मोठे छिद्र होते. तसेच्या त्याच्या फुप्फुसातील दाबदेखील वाढलेला होता. यामुळे या चिमुकल्यावर शस्रक्रिया करणे अतिशय अवघड आणि तितकेच आव्हानात्मक असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.संपूर्ण शस्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असल्याने तितकीच काळजी याप्रसंगी घ्यावी लागणार होती. एसएमबीटी हॉस्पिटलच्या हृदयरोग तज्ञांनी हे आव्हान स्विकारले.

यानंतर या बालकावर हृदय उपचार करण्यात आले. हृदयउपचार झाल्यानंतर पुढील काही दिवस या बालकाची विशेष काळजी घेण्यात आली. पाच दिवस या बालकाची रात्रंदिवस अतिदक्षता (आयसीयू) विभागात काळजी घेऊन त्यास नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज देताना चिमुकल्याच्या नातलगांनी रुग्णालय व डॉक्टरांचे आभार मानले. यावेळी बाळाचा नवा जन्म झाल्याची प्रतिक्रिया या बालकाच्या आई-वडिलांनी दिली.

ऑपरेशन गुंतागुंतीचे होते; मोठा कालावधी लागणार होता. त्यात बालकाचे वय, वजन बघता मोठी रिस्क होती. परंतु, या बालकाच्या चेहऱ्यावर हसू उमटण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न पणाला लावले. शस्त्रक्रियेदरम्यान खूप कौशल्याने सर्व परिस्थिती हाताळली. या बालकाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. बालकाची परिस्थिती अतिशय चांगली असून हळूहळू त्याचे वजनदेखील वाढण्यास सुरुवात होईल.
– डॉ. विद्युतकुमार सिन्हा, एसएमबीटी हार्ट इन्स्टीट्युट

बालकाची झाली मोफत शस्रक्रिया
या चिमुकल्याच्या नातलगांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यांना एवढा मोठा खर्च करणे शक्य नव्हते. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ या चिमुकल्याला मिळाला असून त्यातून मोफत शस्रक्रिया झाली आहे. सध्या पिवळे आणि केशरी शिधापत्रिका धारकांना या योजनेचा लाभ होत आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष अशा स्वतंत्र कक्षाची स्थापना याठिकाणी करण्यात आली आहे. यासाठी १३ जणांची टीम कार्यरत असल्याने येथे येणाऱ्या प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन मिळते.

दोन महिन्यांत ८२ बालकांवर शस्त्रक्रिया
दर महिन्यातील शेवटच्या शनिवार आणि रविवार लहान मुलांच्या हृदयाच्या छिद्राचे (Device Clouser) मोफत उपचार केले जातात. या महिन्यातही वेगवेगळ्या ठिकाणी शिबीर आयोजित करण्यात आले असून यात आढळून आल्या लहान मुलांवर या महिन्यातील दिनांक २९ व ३० ऑक्टोबर 2022 रोजी केले जाणार आहेत. गेल्या दोन महिन्यांत 82 बालकांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

एसएमबीटी हॉस्पिटलची वैशिष्ट्ये
एमएमबीटी हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चॅरिटेबल हॉस्पिटल नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यात धामणगाव-घोटी खुर्द येथे असून रुग्णांच्या विविध आजारांवरील उपचारासाठी पूर्णवेळ तज्ज्ञ डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी सेवेत असतात. ८१० बेडचा आंतर रुग्ण विभाग, १०० आयसीयू बेड, १३ मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, १० एनआयसीयू आणि पीआयसीयू बेड, २४ तास डायलिसीस, मेडिकल रक्तपेढी, रुग्णवाहिका सुविधा, रुग्णांची कुटुंबियांसाठी जेवण, राहण्याची सुविधा याठिकाणी उपलब्ध आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.