मुंबई,दि,१४ मे २०२४ – महाविकास आघाडीच्या काळात विकासकामांना लागलेला ब्रेक या अडीच वर्षांमध्ये उखडून फेकून टाकला.आपण आतापर्यंत खूप कामं केली, गेल्या दोन वर्षांमध्येही अनेक कामं केली, त्याच कामाच्या जोरावर मी शिवसेनेचे सर्व १५ उमेदवार निवडून आणणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री एकनाथ शिदे हे मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात बोलत होते.
शिंदेंना काही जागांवर उमेदवार भेटत नव्हते हा विरोधकांचा आरोप खोडून काढत एकनाथ शिंदे म्हणाले की,आमच्याकडे उमेदवारांची स्पर्धा होती.तिकीट एकच असल्याने निर्णय घेताना मोठी कसरत झाली. या देशातला देशभक्त मतदार हा उद्धव ठाकरेंना येत्या ४ जूनला जागा दाखवणार.त्यामुळे महायुतीच्या ४५ पेक्षा जास्त जागा निवडून येतील.असं ही ते म्हणाले
ते पुढे म्हणाले जे आमच्यावर खोक्यांचा आरोप करतात त्यांना कंटेनरशिवाय चालत नाही, आपल्याकडे विकासाचा अजेंडा आहे तर उद्धव ठाकरेंकडे कोणताही अजेंडा नसल्याने ते असा नॅरेटिव्ह तयार करत असल्याचा आरोप राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
ज्यांना दिवस रात्र, उठता बसता खोक्यांशिवाय चैन पडत नाही त्यांना खोक्याची आठवण येते. यांना खोके नाही तर कंटेनर लागतात हे माझ्याशिवाय जास्त कुणाला माहिती असणार.मी आरोपांना कामाने उत्तर देतोय, हे लोकांना आवडतंय. त्याचमुळे गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती राज्यात एक नंबरला आली.
राज्यात आणि मुंबईत उद्धव ठाकरेंना कोणतीही सहानुभूती नसून येत्या ४ जून रोजी लोकांच्या भावना कुणासोबत आहेत हे समजेल असं एकनाथ शिंदे म्हणाले.मी जे बोलतो त्याला पुरावे आहेत, ये पब्लिक है,सब जानती हे,काम करणाऱ्याच्या मागे लोक राहतात असंही ते म्हणाले.
लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणूकही एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर लढवणार का,शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार का असा सवाल विचारल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, मी कामाला महत्त्व देतो, विकासाला महत्व देतो. माझी विश्वासार्हता ही महत्त्वाची आहे.आता पहिलं लक्ष्य आहे ते मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचं आहे. त्यामुळे विधानसभेचं नंतर पाहू. इंडिया आघाडीकडे नेता कोणता आहे? ही निवडणूक देशाची आहे, राष्ट्र घडवण्याची आहे. त्यामुळे लोक मोदींनी निवडून देतील.