नाशिक,दि,७ फेब्रुवारी २०२५ –एसटी महामंडळाने त्यांच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांना विशेष भेट दिली आहे. त्यानुसार सेवेतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना २ महिन्याऐवजी ४ महिने, तर माजी कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या सहा महिन्याऐवजी नऊ महिने एसटी प्रवासाचा पास मोफत मिळणार आहे. ही सवलत साध्या बससाठीच असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मात्र नाराजी आहे.
चांद्यापासून बांध्यापर्यंत
सर्वसामान्य नागरिकांच्या सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून एसटीच्या प्रवासी वाहतुकीकडे बघितले जाते. एसटी महामंडळात सध्या सुमारे ८६ हजार अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. पती वा पत्नी, दोन मुले, आई-वडील, विधवा बहिणीला महामंडळाकडून प्रत्येक वर्षी दोनदा प्रत्येकी एक महिन्याची मोफत प्रवास पास मिळत होती. परंतु, कामगार संघटनांनी वर्षभर ही सवलत देण्याची मागणी केली. त्यासाठी बऱ्याचदा आंदोलनही केले.
दरम्यान,राज्य परिवहन संचालक मंडळाच्या १८ डिसेंबर २०२४ रोजीच्या बैठकीत कामगार करार २००७-२००८ मधील तरतुदीनुसार सेवेवरील कर्मचाऱ्यांना जानेवारी ते जून या पहिल्या सत्रात दोन महिने तर जुलै ते डिसेंबर या दुसऱ्या सत्रात दोन महिने अशी चार महिने मोफत प्रवास पास देण्यास मंजुरी देण्यात आली. त्याबाबतचा आदेश ४ फेब्रुवारी २०२५ रोजी निघाला. एसटीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पती वा पत्नीला वर्षातून विशिष्ट कालावधीसाठी पूर्वी सहा महिनेच मोफत पास मिळत होती. परंतु, आता ही पास नऊ महिन्यांसाठी मिळणार आहे.
राज्यात नुकतीच शिवाई ही ई-बससेवा सुरू झाली आहे. परंतु, या बसमध्ये पासधारकाला मोफत प्रवासाची मुभा नाही. शिवशाहीने जायचे असेल तर साधी बस आणि शिवशाही बसमधील प्रवास भाड्यातील तफावतीची रक्कम भरून प्रवास करता येतो. शिवाई बसमध्ये मात्र या पद्धतीनेही प्रवासाची मुभा नाही. सेवेवरील कर्मचाऱ्यांना ४ महिने तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ९ महिन्यांचीच पास मिळणार आहे.ही सवलत फक्त साध्या बससाठीच देणे चुकीचे आहे. वर्षभर कोणत्याही एसटी बसमध्ये प्रवासाची मुभा द्यायला हवी, असे मत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.