मुंबई ६ ऑगस्ट, २०२३ – “आई” हा शब्द ऐकताच आपण जगातलं सगळं दु:ख विसरून जातो. ती सोबत असली कि कितीही मोठा अडथळा आपण हिंमतीने पार करतो. आई आयुष्यात असणं, तिचं प्रेम मिळणं हे भाग्यचं ! पण, समाजात अशीदेखील मुलं असतात जी आईच्या वात्सल्यापासून, प्रेमापासून वंचित राहतात. तो आधार, ती माया त्यांच्या नशिबात नसते. पण, महाराष्ट्रात अशी एक व्यक्ती होऊन गेली जिने या अनाथ मुलांना आपलंस केलं, मातृत्वाचा झरा बनून ती लाखो लेकरांची आई बनली. त्यांनी या मुलांचे फक्त संगोपनच केले नाही तर त्यांना जगण्याची नवी उमीद दिली… मार्ग दाखवला. या समाजात अभिमानाने कसं जगायचे ते शिकवलं. त्यांच्या या प्रवासाचा मार्ग काटेरी वाटांनी, अनेक अडथळयांनीं आणि समस्यांनी भरलेला होता. पण, जणू लहान पणापासूनच हे निभावून नेण्याची प्रेरणा त्यांना अनेक कसोटीच्या क्षणांनी आणि वडिलांच्या पाठबळाने मिळाली. दैवाने त्यांना घडवले. कारण पुढे जाऊन त्यांना खूप मोठं कार्य करायचं होतं. ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अनाथ मुलांसाठी वेचलं अशी मूर्तिमंत अनाथांची आई म्हणजेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित “सिंधुताई सपकाळ”. त्यांचा महाराष्ट्राच्या अनाथ लेकरांची माई बनण्यापर्यंतचा प्रवास हा अंगावर शहारे आणणारा, काळीज पिळवटून टाकणारा होता. कुठून आणि कसा सुरु झाला हा प्रेरणादायी प्रवास ? चिंधी अभिमान साठे पासून सिंधुताई सपकाळ कशी घडली ? हा प्रवास आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. कारण, कलर्स मराठी सादर करीत आहे मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदा नवी चरित्रकथा “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची” १५ ऑगस्टपासून संध्या. ७.०० वा. चिंधीची भूमिका अनन्या टेकवडे साकारणार असून किरण माने अभिमान साठे चिंधीचे वडील, योगिनी चौक हिरु साठे चिंधीची आई तर प्रिया बेर्डे पार्वती साठे चिंधीच्या आजीची भूमिका साकारणार आहे.
ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी… म्हणजे सिंधुताई सपकाळ. जशी झाडाची कोवळी मूळ पाण्याच्या शोधत कठीण खडक फोडतात तसंच सिंधू ताईंच आयुष्य आहे. प्रतिकूल परिस्थितीत संघर्षाचे खडक फोडून त्यांनी यश मिळवलं. वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे गावात अभिमान साठे या गुराख्याच्या घरी त्यांचा जन्म झाला. एक अवांछित मूल असल्याने, त्यांचे नाव चिंधी ठेवले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्या वाढल्या. जन्मापासून त्यांचा कष्टमय प्रवास सुरु झाला असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. कष्ट उपसून अर्ध पोटी वाढल्या. लग्न पोर वयात झालं आणि अनंत यातनांचा जीवघेणा संघर्ष त्यांच्या माथी आला. आभाळाला गवसणी घालून कठीण परिस्थीतिशी लढत करून प्राक्तनाच्या अंधाराला छेदून प्रकाश शलाका स्वाभिमानानी नभी प्रकाशली, ती अलौकिक कर्तृत्ववान स्त्री शक्ती म्हणजेच सिंधुताई सपकाळ. अनाथ मुलांच्या संगोपनासाठी त्यांनी १९९२ साली सावित्रीबाई वसतिगृहाची स्थापना चिखलदरा येथे केली. आणि तिथून सुरू झालेला प्रवास कधीच थांबला नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्यांच्या कामगिरीने प्रभाव पाडला. हा प्रवास ऐकायला वा बघायला रोमांचक वाटतो पण खऱ्या अर्थाने त्या रणरागिणी होत्या अनाथ लेकरांच्या, दुखितांच्या. त्यांच्या या प्रवासाचे आपण देखील साक्षीदार होऊया. नक्की बघा “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची” कलर्स मराठीवर.
मालिकेविषयी बोलताना व्यवसाय प्रमुख, कलर्स मराठी, (वायकॉम18) – अनिकेत जोशी म्हणाले, “अनेक वेगवेगळ्या विषयांवर आता मराठी मालिका येऊ लागल्या आहेत. बदलत्या काळानुसार आणि प्रेक्षकांची आवड लक्षात घेता कथांमध्ये, त्याच्या सादरीकरणात देखील बदल झालेले आपण बघत आहोत. महाराष्ट्रात असे समाजसेवक होऊन गेले ज्यांनी जनकल्याणाचा विडा उचलला आणि मोलाची कामगिरी करून गेले. महाराष्ट्रातली अश्याच एका थोर व्यक्तीला या मालिकेद्वारे कलर्स मराठी मानवंदना देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे अनाथ लेकरांची आई सिंधुताई सपकाळ. त्यांचे कार्य, त्यांच्या आयुष्यात आलेले कठीण प्रसंग मालिकेमध्ये मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यांचा प्रवास तुम्हाला जवळून अनुभवता येणार आहे. आम्हांला खात्री आहे तुम्हाला मालिका नक्कीच आवडेल आणि आयुष्य जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देईल”.
मालिकेनिमित्त बोलताना प्रोग्रामिंग हेड, कलर्स मराठी, (वायकॉम18) – विराज राजे म्हणाले, मराठी प्रेक्षक चोखंदळ आहेच परंतु त्याला उत्तम जाण देखील आहे. आशयघन मालिका, उत्तम कथा आणि वास्तविक विषयांवर आधारित मालिका त्यांचे लक्ष वेधून घेतातच. कलर्स मराठीने आजवर विविध विषयांवरील म्हणजेच प्रेमकथा, कौटुंबिक मालिका, सामजिक मुद्दे, राजकारण या विषयांवरील मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या. बऱ्याच दिवसांपासून प्रेरणादायी पात्र किंवा व्यक्तिमत्वावर आधारित मालिका घेऊन यायचं आमच्या मनात होतं आणि त्यासाठी सिंधूताई सपकाळ यांव्यतिरिक्त दुसरा कुठला विषय नसूच शकतो. ताईंचे आयुष्य आणि त्यांचा संघर्ष इतका मोठा आहे की, प्रत्येक घटना, कार्य आणि त्यांचा अभूतपूर्व प्रवास आपल्याला तीन टप्प्यांमध्ये बघायला मिळणार आहे. अडथळ्यांमधून वाट काढत त्या कश्या अनाथ मुलांसाठी झटल्या, आयुष्यात त्यांच्यासमोर आलेल्या असंख्य अडचणींवर त्यांनी कशी धीराने मात केली हे बघायला मिळणार आहे. प्रतिकूल परिस्थितीशी झगडून स्वतःची ओळख इतिहासाच्या आभाळावर लिहिणाऱ्या थोरामोठ्यांच्या चरित्रात्मक कथा ह्या विलक्षण उद्बोधक असतातच शिवाय प्रेरणा देतात. यामालिकेतून आजच्या तरुण पिढीला बरंच काही शिकण्यासारखे आहे. छोट्या – मोठ्या संकटाला घाबरून न जाता त्याला धीराने तोंड देणं आणि त्यातून मार्ग काढला तर यश संपादन करणं काही कठीण नाही हा संदेश देखील त्यांच्यापर्यंत पोहचेल अशी आम्हाला खात्री आहे.”
वात्सल्याचा मानबिंदू, ममतेचा झरा म्हणेज सिंधुताई. लाखो अनाथ बालकांना सिंधुताईंनी करुणेचं आभाळ दिलं… त्यांचं संगोपनचं नव्हे तर प्रत्येकाची वैचारीक जडणघडण केली. त्यांचा हा संघर्षमय प्रवास आता आपल्याला बघता येणार आहे. नवी चरित्रकथा “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची” १५ ऑगस्टपासून संध्या. ७. ०० वा.कलर्स मराठीवर.