वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करा 

नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना निवेदन

0

नाशिक ,१६ नोव्हेंबर २०२२ – राज्यात जवळपास  ३ लाख वृत्तपत्र विक्रेते कोट्यवधी नागरिकांच्या घरात वृत्तपत्र पोहचवण्याचे काम करतात. मात्र वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्यांबाबत, त्यांच्या विकासाकरीता शासनाकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. संघटनेच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत गेली पंधरा वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र अजूनही याबाबत निर्णय घेतला गेलेला नाही. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी उपलब्ध करून देत वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करावे अशी मागणी नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष महेश कुलथे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाव्दारे केली आहे.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज्यपाल महोदयांची वृत्तपत्र संघटनेने भेट घेत संघटनेच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले की, ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता गावागावात ३६५ दिवस वृत्तपत्र पोहचवण्याचे काम विक्रेते करत असतात. कोविड सारख्या काळातही न थांबता माध्यमांची विश्वसार्हता टिकवून ठेवण्याचे काम वृत्तपत्र विक्रेत्यांनी केले. परंतु वृत्तपत्र विक्रेत्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून विक्रेत्यांचे स्टॉल्सवर कारवाई केली जाते. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांना परवाना मिळावा. कोरोनासारख्या महामारीत १४४ विक्रेत्यांचा कोविडमुळे मृत्यू झाला. या काळात विक्रेत्यांनी फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम केले. परंतु या विक्रेत्यांच्या कुटुंबियांना कोणतीही मदत दिली गेली नाही.

कामगार सुरक्षा अधिनियम २००८ नुसार शासनाने वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी समिती स्थापन केली. या समितीने १७ डिसेंबर २०१९ रोजी शासनाला नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे राज्यपालांना निवेदन अहवाल सादर केला आहे. मात्र गेली पंधरा वर्षांपासून विविध आंदोलने, मोर्च, निवेदन देऊनही मंडळ स्थापन करण्यात आले नाही. सध्याच्या महागाईच्या काळात वृत्तपत्र विक्रेत्यांना जगणे मुश्किल झाले आहे. विक्रेत्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या असंघटीत क्षेत्राला वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून शासनाच्या समितीने अहवालात नमूद केल्याप्रमाणे लाभ मिळवून द्यावेत अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली.

याबाबत लवकरच बैठक घेण्यात येऊन निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सचिव महेश कुलथे, उपाध्यक्ष वसंत घोडे, सरचिटणीस भारत मावळे, माजी अध्यक्ष किशोर सोनवणे, उल्हास कुलथे, उत्तम गांगोडे आदी उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!