नाशिकमध्ये अनधिकृतरित्या झालेल्या वृक्षतोडीसंदर्भात गुन्हा दाखल
ठेकेदारास २० लाख ३५ हजार रूपयांचा दंड
मुंबई –नाशिक महापालिका क्षेत्रातील वडनेर गेट ते पाळदे मळ्यापर्यंतच्या रस्त्यावरील ३४ वृक्ष तसेच वडनेरगाव मारूती मंदिराजवळील पिंपळ व कडुनिंब अशा एकूण ३६ वृक्षांची तोड अनधिकृतरित्या करण्यात आली असल्याची तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित ठेकेदारास २० लाख ३५ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
विधानभवन येथे देवळाली परिसरात अनधिकृतरित्या झालेल्या वृक्षतोडी संदर्भात सदस्य श्रीमती सरोज आहिरे यांनी लक्षवेधी मांडली होती. पर्यावरणप्रेमींनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती श्री. शिंदे यांनी उत्तरात दिली.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, वडनेर गेट ते पाळदे मळा पर्यंतच्या रस्त्यावरील वड, पिंपळ, आंबा, कडूनिंब अशा एकुण ३४ वृक्षांचा तसेच वडनेरगाव मारूती मंदिराजवळील पिंपळ व कडूनिंब अशा एकूण ३६ वृक्षांचा विस्तार व उंची अनधिकृतरित्या तोडण्यात आल्याने संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्यासंदर्भात आलेली तक्रारीवर कार्यवाही करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदार यांच्यावर २० लाख ३५ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास मालमत्तेवर बोजा चढविण्याची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, पोलीस तपासातील चौकशीनंतरच्या बाबींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.