Nashik :गोदावरीला हंगामातील पहिला पूर :गंगापूर धरणातून ८००० क्यूसेसने विसर्ग
गोदाकाठावरील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे : महापालिके तर्फे आवाहन
नाशिक,दि,४ ऑगस्ट २०२४- गेल्या दोन दिवसांपासून शहरासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांत कालपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधारे मुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्या मुळे गंगापूर धरणातून ८ हजार क्यूसेसने विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे या हंगामातील पहिला पूर आला असून नदी काठावरील नागरीकांना दक्षतेचा इशारा महापालिका प्रशासना तर्फे देण्यात आला आहे.
तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यांना आले नद्यांचे रूप आल्याचे दिसून आले. यामुळे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली होती.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोसळधारेने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण ८२ टक्क्यांहून अधिक भरले आहे. चार ते पाच तालुक्यांत पावसाने जोर घेतल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासात ९० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे.यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यांना नद्यांचे रूप आले आहे. मंदिराच्या दक्षिण दरवाजाच्या पायऱ्यांवरून मंदिर परिसरात पाणी शिरले. यामुळे दक्षिण दरवाजाजवळील गायत्री मंदिर देखील पाण्याखाली गेले. यावेळी पाण्याबरोबरच कचरा देखील वाहत आल्याचे दिसून आले. यामुळे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली. त्र्यंबकेश्वर मंदिरासह बाजारपेठ, मेनरोड, तेली गल्लीत देखील पाणी शिरले आहे.
उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. उद्या पहिला श्रावणी सोमवार आहे. श्रावणाच्या आदल्या दिवशीच बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या नगरीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाला मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत.
गंगापूरमधून विसर्ग वाढवला
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. आज दुपारी १२ वाजता एकूण ५०० क्युसेकने विसर्ग सोडण्यात आले होते. तर दुपारी ३ वाजता एकूण १ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला. दुपारी चार वाजेपासून ४ हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूरसह दारणा, नांदूरमध्यमेश्वर धरणातून ही विसर्ग सुरु असल्याने जायकवाडीला नाशिकचे पाणी मिळणार आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना जाहीर आवाहन
पावसाचा जोर आज दिनांक ४ ऑगस्ट रोजी दुपारी वाढला असल्यामुळे व गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे व तो टप्प्याटप्प्याने वाढणार असल्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे.पूर बघण्यासाठी नागरिकांनी नदीकिनारी गर्दी करू नये.कुठलाही धोका पत्करू नये. तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास 02532571872 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त तथा आपत्कालीन विभाग प्रमुख स्मिता झगडे यांनी केले आहे.
योगेश कमोद
जनसंपर्क अधिकारी, मनपा नाशिक.