(दीपक ठाकुर,नाशिक) काल फेसबुकवर एक पोस्ट वाचली की म्हणे मिसळ म्हटले की पुणे आठवते, मी म्हटले हट,मिसळ च्या सात बाऱ्या वर फक्त नाशिक चाच हक्क आहे.तसे प्रत्येक शहराचा अथवा प्रांताचा आपला स्वतः चा हक्काचा एक पदार्थ अथवा जिन्नस असतो तसे मिसळ म्हणजे नाशिकचीच. पुण्याच्या ग्रामीण भागातली मासवडी खाणं म्हणजे स्वर्गीय आनंदच. पुण्याच्या अक्खा मसूर ची चव सम्पूर्ण देशात कुठे असणार नाही.थंडगार मस्तानी म्हणजे पुण्याची शान.सिहगडावरची पिठले भाकरी आणि ताक सर्व भूक तहान विसरायला भाग पाडते .
जळगाव म्हटले की कांद्याची पात घालून केलेलं वांग्याचे भरीत आणि कळण्याची भाकरी, ह्याची तुलनाच होऊ शकत नाही आणि ह्या साठी जळगावच्या भोळे मामांच्या कृष्णा भरीत सेंटर ला आवर्जून भेट द्या.धुळ्याची मसाल्याची खिचडी आणि कढी किंव्हा त्याबरोबर लोणचे, कांदा ,उडदाचा पापड आणि खिचडी वर भरपूर गोडेतेल म्हणजे स्वर्गच.
तिकडे कोकणात कोंबडी वडे, सोल कढी ,आंबोळी आणि कुर्ली, शिंपले, खेकडे, बोंबील,मांदेली हे म्हणजे पंचपक्वानच. गरम गरम सडसडीत तांदळाचा भात आणि त्यावर लोणकडी तूप अहा ss काय मजा असते विचारू नका.नागपूर चे झणझणीत सावजीचे मटण आणि वडा भाताची चव ज्याने चाखली आहे तोच त्याचे महत्त्व जाणतो. इकडे औरंगाबादकर आपल्या शेवगा मसाला मानाने मिरवीत असतात त्यासाठी जालना रोडवर असलेले काळे जगप्रसिद्ध आहेत.खरंच सांगतो पुन्हा जेंव्हा औरंगाबाद ला जाल तेंव्हा आठवणीने शेवगा मसाला खा,असा कुठेच मिळत नाही.पेढ्याचे असंख्य प्रकार आहेत पण कंदी पेढा कुंथलगिरीचाच खावा.
मुंबई म्हटले की झटकन वडापाव डोळ्यासमोर येतो पण पुढच्या वेळी मुंबई ला जाल तेव्हा हाजीअली ला सीताफळ कस्टर्ड जरूर टेस्ट करा,महम्मद अली रोड सारखे शीक कबाब आलम दुनियेत तुम्हाला कुठंच मिळणार नाहीत. गेटवे ऑफ इंडिया ला जाल तेव्हा बडेमिया ची बिर्याणीचा जरूर आस्वाद घ्या आणि त्यानंतर माहीमच्या हलव्याची चव म्हणजे अवर्णनीय आनंदच देईल.
नासिक पुणे रोड वर संगमनेर हे छोटं शहर लागते, त्याबाजूला जाल तर राजहंस ची सोनपापडी नक्की खा, तोंडात टाकल्या टाकल्या विरघळते इतकी मुलायम आणि स्वादिष्ट असते.त्याच्या अलीकडे सिन्नर आहे गोडीशेवसाठी प्रसिद्ध,चव तर अप्रतिम च पण तोंड मस्त पोपटासारखं लाल लाल रंगवते.कोल्हापूर चा झणझणीत मटणाचा तांबडा पांढरा रस्सा म्हणजे आत्मिक सुखाचा परमोच्च बिंदू च.जसे इंदूर चे पोहे प्रसिद्ध तसे इथला नाष्टा म्हणजे कटवडा अर्थात वडा रस्सा.
नासिक जवळ वडाळी भोई हे गाव आहे धुळ्याकडे जाताना, तिथली भजी आणि गोड खवा एकच नंबर,तशीच भजी आता पुढे त्याच रस्त्यावर सोगरस फाट्यावर मिळते.जशी कचोरी खावी तर शेगाव चीच तशी गुळपट्टी खावी बुलडाण्याचीच.सोलापूरच्या नसले शेंगदाणे चटणीची चव कुठेच मिळणार नाही तुम्हाला. बासुंदी खावी तर फक्त बार्शीचीच.अक्कलकोट मंदिराच्या महाप्रसादाचे जेवण म्हणजे पूर्णब्रह्मचआणि हो खान्देशी,डाळमेथ्याची आमटी, चकोल्या,फक्त नवापूर नंदुरबार आणि धुळ्यालाच मिळणारी पात्रावडी(अळू वडी), मुगाची भजी, ईमरती,बुरहानपूर ची तळलेली मूगदाळ रावेरच्या गुळाच्या रेवड्या ,अहाहा, धुळ्यावरून जळगाव ला जाताना पारोळा हे गाव लागते तेथील गणेश लंच होमची खीर खाउन तर बघा, धमाल आहे.
संगमनेर जवळ लोणी कडे जाताना समनापूर लागते तिथे अन्सार चाचाचा नसीब वडापाव नक्की टेस्ट करा वडा तर जबरदस्त आहेसच पण अन्सारी चाचाचे मार्केटिंग स्किल शिकण्यासारखे आहे, तसेच जर तुम्ही नॉनव्हेज चे शौकीन असाल तर अहमदनगर दौंड रोड वर असलेल्या हॉटेल सचिन ची खासदार थाळी अवश्य टेस्ट करा,एकाच थाळीत तुम्हाला मटण, चिकन, मासे ,सुकट आणि अंडी सगळे काही मिळेल.
नाशिक वरून मुंबई ला जाताना पढगा जवळील श्री दत्त ची कोथिंबीर वडी नक्की ट्राय करा, त्याच रोड वर पुढे सिधू च्या धाब्यावर ची दाल मक्खनी म्हणजे तुमच्या तोंडाला हमखास पाणी सुटणार .इकडे आमच्या नाशिक रोड ला आलात तर स्टेशन जवळची आशा ची लस्सी पिउन तर पहा, कमीत कमी दोन ग्लास नक्की प्याल, थोडे पुढे आलात तर राणा चे साबुदाणा थालीपीठ म्हणजे अस्सल मेजवानीच. खवय्या असल्याने ठिक ठिकाणी भटकंती च्या वेळी आलेले अनुभव इथे मांडले, माझा तुम्हाला आग्रह आहे जेंव्हा जेंव्हा ह्या परिसरात जाल तेंव्हा नक्की आपल्या जिभेचे चोचले पुरवा.(क्रमशः)
दीपक ठाकुर,नाशिक
९८२३३५१५०५