बालरंगभूमी परिषदेतर्फे विनामूल्य निवासी कला-संस्कार शिबिराचे आयोजन

0

नाशिक ,दि,१३ एप्रिल २०२५ –जीवनांत संस्काराचे खूप महत्त्व आहे. संस्काराशिवाय जीवन शून्य असते. संस्कारच मनुष्याला श्रेष्ठ बनवितात, उत्तम आकार देतात, याचाच विचार करुन संस्कारासोबत कलांनी बालकांची सृजनशीलता वाढविण्याकरिता बालरंगभूमी परिषदेतर्फे कोल्हापूर येथील कणेरी मठात निवासी कला-संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्वोत्तम जीवनाचा पाया उत्तम संस्कारांवरच अवलंबून असतो.  संस्कार संस्कृतीनेच उत्पन्न होतात यासोबतच आपली दिनचर्या नियमित ठेवणे, आहारनियमांचे पूर्ण पालन करणे, या सर्व गोष्टी शारीरिक, मानसिक दृष्टीने खूप जरूरी आहे. सामाजिक स्वास्थ्याकरिताही याची नितांत गरज आहे म्हणूनच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न संस्था  बालरंगभूमी परिषदेतर्फे कोल्हापूर येथील कणेरी मठ या निसर्गरम्य ठिकाणी तीन दिवसीय कला-संस्काराचे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे कला-संस्कार शिबिर दोन टप्प्यात होणार असून,  पहिले संस्कार शिबिर दि. २ ते ४ मे  या कालावधीत तर दुसरे संस्कार शिबिर दि. ६ ते ८ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील बालरंगभूमीच्या २८ शाखाद्वारे ९ ते १५ या वयोगटातील बालकांना सहभाग घेता  येणार आहे. बालकांसाठी कला-संस्कार शिबिरातील प्रवेश हा विनामूल्य असणार आहे.

या कलासंस्कार शिबिरात मुलांना निसर्गाच्या सानिध्यात वास्तव्यास नेणे, सहभोजन, सहनिवास आणि स्वयंपूर्ण जीवनशैलीची ओळख व अनुभवातून त्यांच्यातील स्वावलंबन व प्रसंगावधान वाढवणे, भारतीय कला – क्रीडा आणि संस्कृती यांचा हसत खेळत परिचय करून देण्यात येणार आहे. श्रवण, मनन, निरीक्षण या कृतीतून ज्ञान देण्यासोबतच योगाभ्यास, रंगमंच खेळ, जुन्या पिढीचे प्रांगणातील खेळ, चित्रकला, प्रार्थना, श्लोक, ज्येष्ठ व्यक्तींचा आदर सन्मान याबद्दल कृतीशील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

मुलामुलींसोबतच पालकांनाही या शिबिरात सशुल्क सहभाग घेता येणार असून, बालकांची मानसिकता, आयक्यूसोबतच इक्यू वाढविण्यावर भर, यासोबतच मुलांचे भावविश्व, त्यांचा सामाजिक व शैक्षणिक विकास यावर पालकांच्या कृतीरुप  विविध कार्यशाळा व  विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिरात प्रवेश मर्यादित असून, सहभागी होण्यासाठी बालरंगभूमी परिषदेच्या नाशिक शाखेशी 9326536524 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईतर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!