गँगस्टर अतिक अहमद आणि अश्रफ अहमद यांची गोळ्या घालून हत्या
हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात जवळून गोळ्या झाडल्या : हत्येचा थेट व्हिडिओ आला समोर
प्रयागराज,दि.१६ एप्रिल २०२३ – उत्तर प्रदेशमधील माफिया डॉन आणि समाजवादी पार्टीचा माजी खासदार अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची प्रयागराज मेडिकल कॉलेजजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी नेले जात असताना तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.दोघांवरही हल्लेखोरांनी जवळून गोळ्या झाडल्या. गोळीबार करणाऱ्या तीन हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे.माफिया डॉन अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
उमेश पाल हत्याकांडप्रकरणी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ दोघांना धुमनगंज पोलीस ठाण्याच्या कस्टडीत ठेवण्यात आले होते. तेथून त्यांना प्रयागराज जेलमध्ये ठेवण्याचा निर्णय झाल्याने दोघांना मेडिकलसाठी घेऊन आले असताना अचानक दोन-तीन जणांनी अतिक आणि त्याच्या भावावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात अतिक आणि अशरफ या दोघांचा मृत्यू झाला.सुमारे दहा राऊंड गोळीबार झाला. दरम्यान, एक जवानही जखमी झाला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.सध्या प्रयागराजमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ माध्यमांशी संवाद साधत असतानाच दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे पोलीसही गोंधळून गेले. हल्लेखोर पत्रकारांच्या वेशात आले होते. पोलीस घेऱ्यात असलेल्या अतीक आणि अशरफ यांच्या कानशिलावर बंदूक टेकवून गोळ्या झाडण्यात आल्या. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
काय होते शेवटचे शब्द?
पोलीस व्हॅनमधून उतरताच पत्रकारांनी अतीक आणि अशरफ यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपूर्वीच अतीकचा मुलगा असद आणि त्याचा साथिदार गुलाम यांचे उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटर केले होते. दोघांनाही शनिवारी सायंकाळी प्रयागराज येथे दफन करण्यात आले. याबाबत पत्रकारांनी अतीकला विचारले की, तुम्हाला अंत्ययात्रेला नेले नाही, याबाबत तुम्हाला काही बोलायचे आहे का? यावर अतीक म्हणाला की, ‘आम्हाला नेले नाही. पण मुख्य गोष्ट ही आहे की…’, एवढे बोलताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
विशेष म्हणजे दोघांनाही पोलीस बंदोबस्तामध्ये नेत असताना हा हल्ला झाला. यानंतर अतीक आणि अशरफच्या सुरक्षेसाठी तैनात १७ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.कॅमेऱ्यासमोर झालेल्या या हत्याकांडामुळे उत्तर प्रदेश पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण होत आहेत. प्रशासनानेही याची दखल घेत १७ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानाची सुरक्षाही वाढण्यात आली आहे. यासह उत्तर प्रदेशमधील सर्व जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले असून पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
#WATCH | Uttar Pradesh: Moment when Mafia-turned-politician Atiq Ahmed and his brother Ashraf Ahmed were shot dead by assailants while interacting with media.
(Warning: Disturbing Visuals) pic.twitter.com/PBVaWji04Q
— ANI (@ANI) April 15, 2023