मुंबई, दि. १५ ऑक्टोबर २०२५ – Gautami Patil Lalit Prabhakar मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेलं गाणं म्हणजे ‘दिसला गं बाई दिसला २.०’! (Disla Ga Bai Disla )‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’ प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटातील हे गाणं दिवाळीच्या उंबरठ्यावरच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. जुन्या लोकप्रिय गाण्याला आधुनिक बीट्स आणि नव्या सादरीकरणाची साथ देत या गाण्याने तरुणाईला अक्षरशः वेड लावलं आहे.
गौतमी पाटीलच्या (Gautami Patil Lalit Prabhakar) जोशपूर्ण नृत्यशैलीनं आणि ललित प्रभाकरच्या करिष्माई उपस्थितीनं या गाण्याला एक वेगळाच ठेका मिळाला आहे. राम कदम यांच्या अप्रतिम संगीतात अविनाश-विश्वजीत जोडीचं नवचैतन्य मिसळलं असून, जगदीश खेबुडकर आणि विश्वजीत जोशी यांच्या अर्थपूर्ण शब्दांनी गाण्याला जुनी ओळख आणि नवी ओढ दिली आहे. राधा खुडे, आदर्श शिंदे आणि विश्वजीत जोशी यांच्या आवाजातलं हे गाणं आता प्रत्येक डान्स प्लेलिस्टचं नवं स्टार अॅडिशन ठरतंय.
पॉल मार्शलच्या नृत्यदिग्दर्शनानं गाण्यातील प्रत्येक बीटला दृष्य रूप दिलं आहे — पारंपरिक लावणीचा लयकारी तडका आणि आधुनिक बीट्सची धडधड या दोन्हीचा सुंदर मिलाफ इथे दिसतो.
दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले, “हे गाणं आम्ही नव्या पिढीला लक्षात घेऊन साकारलं आहे. जुनं गाणं पुन्हा जिवंत करताना त्याचा आत्मा जपणं आमचं ध्येय होतं. गौतमी पाटीलच्या एनर्जीमुळे ते शक्य झालं.”
निर्माते संजय छाब्रिया यांनी सांगितलं, “आधीच्या दोन गाण्यांना प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. आता ‘दिसला गं बाई दिसला २.०’ ने तो उत्साह आणखी वाढवलाय. जुना ठेका आणि नव्या तालाची सांगड — हाच या गाण्याचा आत्मा आहे.”
‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’चे संजय छाब्रिया आणि सहनिर्माते अमित भानुशाली यांच्या निर्मितीत बनलेला ‘प्रेमाची गोष्ट २’ हा चित्रपट २१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्निल जोशी आणि भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. “प्रेम आणि नशिबाचा जादुई प्रवास” या टॅगलाइनसह येणारा हा चित्रपट या दिवाळीत प्रेमकथेचं नवं पर्व उलगडणार आहे.