राज्यपाल सत्यपाल मलिक,पूर्व रॉ प्रमुख ए.एस.दुलत यांना संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष,माजी केंद्रीय मंत्री खा.शरद पवार यांच्या हस्ते गुरुवार ७ एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे वितरण
नवी दिल्ली –मेघालयचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक आणि रॉ चे पूर्व प्रमुख श्री ए.एस. दुलत यांना त्यांनी सीमेवरील राज्ये आणि महाराष्ट्राचे संबंध दृढ करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल प्रतिष्ठित संत नामदेव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. २०२१ चा पुरस्कार श्री मलिक यांना तर २०२० साठीचा श्री दुलत यांना जाहीर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते हा सन्मान दिल्ली येथे ७ एप्रिलला दिला जाणार आहे. दिल्ली शिख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष हरमीत सिंह काल्का हे पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष असतील.अशी माहिती अरुण नेवासकर, संयोजन समितीचे अध्यक्ष संतसिंग मोखा आणि सरहदचे संस्थापक-अध्यक्ष संजय नहार यांनी दिली.

संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार दरवर्षी पुण्यातील सरहद संस्थेतर्फे दिला जातो. सरहद हि एक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्था आहे. गेली चार दशके सीमावर्ती भागातील संघर्षाने प्रभावित लोकांसाठी काम करत आहे. सरहद अशा सीमावर्ती भागातील लोकांचे पुण्यातील व महाराष्ट्रातील लोकांशी संबंध दृढ होण्यासाठी सतत प्रयत्नशील असते.
हा पुरस्कार सीमावर्ती भागातील अशा लोकांशी महाराष्ट्राचे नाते जोडण्यासाठी काम करणाऱ्या प्रतिष्ठित पंजाबी व्यक्तींना दिला जातो. तेराव्या शतकातील संत-कवी नामदेव यांच्या नावाने हा सन्मान दिला जातो. संत नामदेवांना शिख धर्मात मानाचे स्थान आहे संत नामदेव यांनी २३ वर्षे पंजाबमध्ये राहून तेथील लोकांना भक्ती संप्रदायाची शिकवण दिली. नामदेवांनी पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमान येथे आपला देह ठेवला असे मानले जाते. कोणत्याही क्षेत्रातील उल्लेखनीय राष्ट्रीय कार्याबद्दल रुपये एक लाख एक हजार रोख आणि सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दिला जातो.
“मेघालयचे मा. राज्यपाल श्री. सत्यपाल मलिक आणि रॉ चे प्रमुख श्री ए.एस. दुलत यांना हा पुरस्कार देताना आम्हाला आनंद होतो आहे. या दोघांनी सीमावर्ती भागात शांतता, विकास आणि समृद्धी साठी उल्लेखनीय कार्य केले आहे. महाराष्ट्र आणि सीमावर्ती भागातील लोकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.”असे अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष अरुण नेवासकर, संयोजन समितीचे अध्यक्ष संतसिंग मोखा आणि सरहदचे संस्थापकअध्यक्ष संजय नहार यांनी सांगितले.
“संत नामदेवांनी पंजाबमध्ये सामाजिक सुधारणेसाठी काम केले. त्यांच्या नावाचा उल्लेख शिख धर्मग्रंथात आढळतो. त्यांच्या नांवे भरीव राष्ट्रीय काम करणाऱ्या शिख व्यक्तींना हा सन्मान दिला जातो. पंजाब आणि महाराष्ट्राच्या परंपरागत नात्याचा सन्मान करण्यासाठी आणि ते दृढ करण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न आहे,” असे सरहदचे संस्थापक-अध्यक्ष संजय नहार म्हणाले.
पूर्वी या पुरस्काराने सन्मानित केलेले मानकऱ्यांमध्ये लेखक-गीतकार-दिग्दर्शक गुलज़ार, अर्थतज्ञ मोन्टेक सिंह अहलुवालिया, पंजाब केसरीचे मालक-संपादक विजयकुमार चोप्रा, दिवंगत माजी पंतप्रधान चंद्रशेखर, सामाजिक कार्यकर्ते सत्यपाल आणि विमला डांग, माजी पोलीस अधिकारी एस.एस. विर्क, वरिष्ठ पत्रकार जतींदर पन्नू, पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. प्रकाशसिंग बादल, जम्मू आणि काश्मीर राज्याचे माजी राज्यपाल मा. एन. एन व्होरा आणि कुलदीप नय्यर आणि चित्रपट निर्माते यश चोप्रा यांचा समावेश होता.