मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.त्यांनी असं वक्तव्य करुन महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखवल्या आहेत. त्यांनी तात्काळ माफी मागावी, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे.
गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे. काल मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांचं हे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, त्यांना नारळ द्या अशी मागणी आता विरोधकांनी केली आहे.राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हे वक्तव्य ट्विट करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला..स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका..मुख्यमंत्री शिंदे..राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे, असं राऊतांनी आपल्या ट्विट मधे म्हटलं आहे.
आता तरी..
ऊठ मराठ्या ऊठ..
शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे..
बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत..
मराठ्या तुलाच उठावे लागेल.. pic.twitter.com/QYX4weHdQ2— Sanjay Raut (@rautsanjay61) July 30, 2022
राज्यपालांनी नाही त्या विषयात नाक खुपसण्याची गरज नाही’ – मनसे नेते संदीप देशपांडे
‘ही तर बौद्धिक दिवाळखोरी आहे.ज्या गोष्टींचा आपल्याला इतिहास माहित नाही.त्या गोष्टीबद्दल राज्यपालांनी इतर विषयांमध्ये नाक खुपसण्याची गरज नाही’ अशा शब्दांत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला.
राज्यपालांच्या वक्तव्याने शिंदे गटआक्रमक
मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराती समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असे वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं.त्यांच्या या वक्तव्यावरून टीकेचा सूर उमटत आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही नाराजी व्यक्त केल्याचं समोर आलं आहे. एकनाथ शिंदे यासंदर्भात केंद्र सरकारकडे तक्रार करतील, अशी माहिती केसरकरांनी आपल्या मुलाखतीत दिली.
राज्यपालांनी मराठी माणसाचा अपमान केल्याचं बिलकूल वाटत नाही : नितेश राणे
राज्यपालांच्या वक्तव्याने विरोधक आक्रमक झाले असले तरी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्यपालांचं समर्थन केलं आहे. मी त्या कार्यक्रमात होतो. राज्यपाल काहीच वावगं बोलले नाही. त्यांनी मुंबईच्या उत्कर्षात योगदान देणाऱ्या त्या त्या समाजाची आठवण करून दिली. राज्यपालांनी कुणाचा अपमान केला असता तर आम्ही बोललो असतो. त्यांनी त्या त्या समाजाच्या योगदानाचा उल्लेख केला आहे. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला असं मला बिलकूल वाटत नाही, असं नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलतांना म्हटलं आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.
नितेश राणे म्हणाले. मी त्या कार्यक्रमात होतो. राज्यपालांनी कोणाचा अपमान केलाय? हा प्रश्न मला विचारायचा आहे. ज्या ज्या समाजाने इथे योगदान दिलं त्याची केवळ राज्यपालांनी आठवण करून दिली. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला असं मला वाटत नाही.