नाशिक शहरातील स्मार्ट सिटीच्या कामांची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणी
रामकुंडात स्वच्छ पाणी गेल्याशिवाय नाशिक स्मार्ट होणार नाही : शहरातील ड्रेनेजचे पाणी प्रक्रिया केल्याशिवाय गोदावरीत जाता कामा नये - छगन भुजबळ
नाशिक – नाशिक शहराला ऐतिहासिक असे महत्व असून शहर स्वच्छ व सुंदर असल्याशिवाय तसेच पौराणिक महत्व असलेल्या रामकुंडात स्वच्छ पाणी आल्याशिवाय नाशिक शहर स्मार्ट सिटी होणार नाही. त्यामुळे नाशिक शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासोबतच शहरातील ड्रेनेजचे पाणी प्रक्रिया केल्याशिवाय गोदावरी नदी पात्रात जाताच कामा नये असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक शहरातील विविध ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत पूर्ण झालेल्या व सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांची पाहणी करत आढावा घेतला. यावेळी पाहणी दरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या.
यावेळी नाशिक महानगपालिका आयुक्त रमेश पवार, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, महानगपालिका उपायुक्त मनोज घोडे पाटील, देविदास भालेराव, स्मार्ट सिटीचे प्रकल्प संचालक दिग्विजय पाटील, किसन कानडे, निलेश परडे, निखिल भोईर, महेश जगताप, आशिष सुर्यवंशी, सुरेश सुर्यवंशी, गिरीजा शारंगधर, संजय पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, गजानन शेलार, बाळासाहेब कर्डक, अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, कल्पना पांडे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्यासह नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
नाशिक शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या विविध विकास कामांची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. त्यांनी आज महात्मा फुले कलादालन येथील प्रदर्शन हॉल व ऑडीटोरियम हॉल, नेहरू गार्डन येथील स्मार्ट सिटी अंतर्गत सद्यस्थितीत झालेले काम, रामवाडी व रामकुंड येथील गोदा प्राजेक्टचे सुरू असलेले कामे, पंचवटी मोटार डेपो येथील ESR व GSR कामे, पंडित पलुस्कर सभागृह ऑडोटोरीअमची कामे व दहीपूल येथील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची पाहणी करत अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, महात्मा फुले कलादालन येथील प्रदर्शन हॉलसह ऑडीटोरियम येथे कॅन्टिनसह अद्यावत व आकर्षक सेवा सुविधा असणे आवश्यक आहे. नागरिकांना या प्रकल्पाची माहिती होण्यासाठी त्याची जाहिरात करून ही वास्तू संगीत कार्यक्रम, प्रदर्शनासाठी उपयोगात आणावी. नेहरू गार्डनसह सर्व प्रकल्पांची नियमित स्वच्छता देखभाल दुरूस्ती करुन तेथे असलेल्या महापुरूषांच्या पुतळ्यांना आकर्षक दिव्यांची रोषणाई करण्यात यावी, अशा सुचना पालकमंत्री यांनी यावेळी उपस्थित अधिकारी यांना दिल्या आहेत.
पालकमंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, रामकुंड सारखा परिसर हा गर्दीत हरवला आहे. आगामी कुंभमेळा लक्षात घेता येथील परिसर हा मोकळा करून चांगली प्रकाश व्यवस्था करुन ते ठिकाण सुशोभित कसे करता येईल याकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. रामसेतू हा पुर्व व पश्चिम भागाला जोडणारा दुवा आहे, परंतु या पुलाची मजबुती कमी झाल्याने सध्या यावर वाहनांना प्रवेश बंद केला आहे. या पुलाचे मजबुतीकरण करणे आवश्यक असून हा पुल केवळ पादचाऱ्यांसाठी खुला करून त्याचे सौंदर्यीकरण करून सुशोभित केल्यास यावर सेल्फी पॉइंन्टस करता येणे शक्य आहे.
दहिपूल परिसरात पावसाळ्यात खुप पाणी साचते, परिणामी त्या परिसरातील व्यावसायिकांचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी हा परिसर समतल करून पाण्याचा योग्य निचरा होण्याच्या दृष्टीने अद्यावत व कायमस्वरूपी उपाययोजना करावी. गोदा पत्रात सिमेंट काँक्रीटचे कामे होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच गोदा पात्रात सांडपाणी प्रक्रिया करूनच सोडण्यात यावे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी स्मार्ट सिटी व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.