गुजरात, दि. १५ ऑगस्ट २०२५ – Gujarat Honor Killing गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात १८ वर्षीय NEET विद्यार्थीनी चंद्रिका चौधरीच्या खळबळजनक हत्येचा उलगडा झाला असून, हे प्रकरण ऑनर किलिंगचे असल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. चंद्रिकेने NEET परीक्षेत ४७८ गुण मिळवत सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याची संधी निर्माण केली होती. मात्र, तिच्याच वडिलांनी आणि दोन काकांनी मिळून तिचा जीव घेतला.
मृत्यूपूर्वी चंद्रिकेने आपल्या लिव-इन पार्टनर हरेशला पाठवलेला शेवटचा संदेश या प्रकरणाची भीषणता अधोरेखित करतो. त्यात तिने लिहिले होते – “आकर मला वाचव नाहीतर हे लोक माझे लग्न लावून देतील. जर मी नकार दिला तर मला ठार मारतील.”
लिव-इन रिलेशनशिपमुळे वाढला घरच्यांचा संशय(Gujarat Honor Killing)
चंद्रिका आणि हरेश लिव-इन रिलेशनशिपमध्ये होते. घरच्यांना याची कल्पना होण्याची भीती चंद्रिकेला सतावत होती. तिच्या संदेशातून तिची भीती, असुरक्षितता आणि बेबसी स्पष्ट होते. २४ जून रोजी, हा संदेश पाठवून काही तासांतच तिचा मृतदेह घरात सापडला. हरेशने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी सांगितले की, या हत्येत चंद्रिकेचे वडील आणि दोन काका सहभागी होते. त्यापैकी एक काका शिवराम चौधरीला अटक करण्यात आली असून, वडील आणि दुसरा काका फरार आहेत.
शिक्षणाऐवजी ‘बदनामी’ची भीती
पोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली. काका शिवराम यांनी सुरुवातीला चंद्रिकेसाठी काही कॉलेजांची चौकशी केली, परंतु तेथे मुलं-मुली एकत्र शिकत असल्याचे पाहून त्यांनी विरोध सुरू केला. त्यांच्या मते, मुलांशी ओळख झाल्यास चंद्रिका घरच्या इच्छेविरुद्ध लग्न करू शकते आणि त्यामुळे ‘कौटुंबिक बदनामी’ होईल.याच कारणास्तव घरच्यांनी चंद्रिकेचा फोन काढून घेतला, सोशल मीडियापासून तिला तोडले आणि तिला घरकामात गुंतवले.
नियोजनपूर्वक हत्या
FIR नुसार, २४ जून रोजी वडिलांच्या सांगण्यावरून काका शिवराम यांनी चंद्रिकेला दूधात झोपेचे औषध देऊन बेशुद्ध केले. नंतर दोन्ही भावांनी तिला घराच्या स्टोअररूममध्ये नेऊन ओढणीने गळा आवळला. हे आत्महत्येसारखे भासावे म्हणून घटनेची रचना केली गेली.
हत्यानंतर गावकऱ्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या – काहींना हार्ट अटॅक, तर काहींना आत्महत्या असा दावा करण्यात आला. मात्र, हरेशने कोर्टात दाखल केलेल्या हबियस कॉर्पस याचिकेमुळे प्रकरण उघड झाले. तपासात पोलिसांना ठोस पुरावे मिळाले की ही हत्या पूर्णपणे नियोजित होती.
न्यायाची लढाई सुरू
२५ जूनला चंद्रिकेच्या मृत्यूनंतर हरेशच्या याचिकेमुळे हे प्रकरण सार्वजनिक झाले. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून एका आरोपीला अटक केली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
हे प्रकरण केवळ एका मुलीच्या स्वप्नांचा अंत नाही, तर शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारी चिंताजनक घटना आहे. ऑनर किलिंगसारख्या मानसिकतेला आळा घालण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि सामाजिक जागरूकता हीच खरी गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सांगत आहेत.