नाशिकमध्ये ‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’चा दिमाखदार समारोप
४.९९% गृहकर्ज योजना, हरित नाशिकचा संदेश आणि नाशिककरांचा विक्रमी प्रतिसाद

नाशिक, दि. २२ डिसेंबर २०२५ – घर हे केवळ चार भिंतींचे ठिकाण नसून, ते माणसाच्या स्वप्नांचे, सुरक्षिततेचे आणि भविष्यातील आशांचे केंद्र असते. हीच भावना केंद्रस्थानी ठेवत नरेडको नाशिकच्या वतीने आयोजित ‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’चा १८ ते २१ डिसेंबर दरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावर भव्य आणि यशस्वी समारोप झाला. घरखरेदी, गुंतवणूक, आधुनिक जीवनशैली आणि पर्यावरणपूरक विकास यांचा सुरेख संगम साधणाऱ्या या प्रदर्शनाला नाशिककरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आयोजकांसाठी समाधानकारक ठरला.
चार दिवस चाललेल्या या प्रदर्शनात नाशिक शहरासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत घरखरेदीबाबतची आपली स्वप्ने प्रत्यक्षात उतरवली. मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांच्या संकल्पनेतून साकारलेली ४.९९ टक्के गृहकर्ज योजना आणि “जेवढे नागरिक प्रदर्शनाला भेट देतील, तेवढी झाडे लावली जातील” हा अभिनव पर्यावरणपूरक उपक्रम हे या वर्षीच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले. या दोन्ही उपक्रमांमुळे प्रदर्शन केवळ व्यावसायिक मर्यादेत न राहता सामाजिक आणि पर्यावरणीय बांधिलकीचे प्रतीक बनले.
फ्लॅट्स, प्लॉट्स, कमर्शियल प्रॉपर्टी, गृहकर्ज सुविधा, इंटिरियर डिझाइन, स्मार्ट होम सोल्यूशन्स तसेच व्हर्च्युअल रिअॅलिटीद्वारे प्रोजेक्ट पाहण्याची सुविधा – या सर्व गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध करून देत नरेडकोने घरखरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि विश्वासार्ह केली. अनेक कुटुंबांसाठी ही केवळ माहितीची देवाणघेवाण नव्हती, तर आयुष्यभराच्या गुंतवणुकीचा महत्त्वाचा निर्णय घेण्याची संधी होती.
प्रदर्शनाला मिळालेल्या प्रतिसादाची आकडेवारीही तितकीच बोलकी ठरली. चार दिवसांत ४० ते ४५ हजारांहून अधिक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली, तर ३१२ जणांनी प्रत्यक्ष बुकिंग करत आपल्या स्वप्नातील घर निश्चित केले. प्रत्येक बुकिंग करणाऱ्या ग्राहकाला नरेडकोच्या वतीने १० ग्रॅम चांदीचे नाणे भेट देण्यात आल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. असे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर आणि सचिव शंतनु देशपांडे यांनी दिली.
या प्रदर्शनाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे यांनी प्रदर्शनास भेट देऊन नरेडको टीमचे कौतुक केले.या प्रदर्शना पुरते मर्यादित न राहता आपण नियमित भेटू असे सांगितले.लॉन्ग वीकेंडचा लाभ घेत अनेक कुटुंबांनी साइट व्हिजिट्स केल्या. प्रत्यक्ष प्रकल्प पाहून, बांधकामाची गुणवत्ता, परिसरातील सुविधा आणि भविष्यातील विकासाच्या शक्यता तपासून घरखरेदीचा निर्णय घेण्यात आला. परिणामी, सदनिका, शॉप्स आणि प्लॉट्सचे मोठ्या प्रमाणावर स्पॉट बुकिंग झाले. या उत्साहामुळे बांधकाम व्यावसायिक आणि स्टॉलधारकांमध्येही समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
प्रदर्शनातील काही वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांनी विशेष लक्ष वेधून घेतले. १२.५२ कोटी रुपयांचा सर्व सुखसोयींनी युक्त आलिशान फ्लॅट, तसेच मुंबईप्रमाणे नाशिकमध्ये ४५ मजल्यांपर्यंत उंच इमारती उभारण्याचे प्रस्ताव असलेले गोविंद नगर, गंगापूर रोड, नवश्या गणपती आणि सोमेश्वर परिसरातील प्रकल्प ग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले. याशिवाय काही नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी नाशिकबरोबरच पुणे, मुंबई व इतर शहरांतील प्रोजेक्ट्सची माहिती उपलब्ध करून दिल्याने, नाशिकच्या नागरिकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी इतर शहरांतील गुंतवणुकीचे पर्याय समजून घेता आले.
प्रदर्शनाला मिळालेल्या यशस्वी प्रतिसादामुळे अनेक स्टॉलधारकांनी “पुढील वर्षीचे स्टॉल आताच बुक करा” असा सूर लावत तीन जणांनी नरेडकोची मेबरशीप घेऊन पुढील आयोजनाबाबत उत्सुकता व्यक्त केली. हे प्रदर्शन केवळ व्यवहारापुरते मर्यादित न राहता, नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील विश्वासाचा भक्कम पाया अधिक मजबूत करणारे ठरले.या भव्य आयोजनासाठी विविध नामांकित स्पॉन्सर्सचे मोलाचे सहकार्य लाभले. दीपक बिल्डर अँड डेव्हलपर्स यांनी टायटल स्पॉन्सर म्हणून सहभाग घेतला, तर एबीएच डेव्हलपर्स आणि ललित रूंगटा ग्रुप को-पॉवर्ड बाय म्हणून सहभागी झाले. याशिवाय जॅक्वार अँड सिरॅमिक ट्रेडर्स, द व्हीआर कंपनी आणि बीएसएनएल यांचेही सहकार्य प्रदर्शनाच्या यशात महत्त्वाचे ठरले.
हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी नरेडकोच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले. मुख्य समन्वयक जयेश ठक्कर, सहसमन्वयक उदय शाह, मार्जियान पटेल, अभय नेरकर, माजी चेअरमन अभय तातेड, अध्यक्ष सुनील गवादे, सचिव शंतनु देशपांडे, खजिनदार भूषण महाजन यांच्यासह भाविक ठक्कर, पुरुषोत्तम देशपांडे, प्रशांत पाटील, हर्षल धांडे, प्रसन्न सायखेकर, मुकुंद साबु, पंकज जाधव, ताराचंद गुप्ता, परेश शहा, राजेंद्र बागड, मयूर कपाटे, नितीन सोनावणे, शशांक देशपांडे आदी सदस्यांनी आयोजनात मोलाचे योगदान दिले.
संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नांमुळे होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ हे केवळ प्रदर्शन न राहता, नाशिककरांसाठी विश्वासार्ह, उपयुक्त आणि प्रेरणादायी व्यासपीठ ठरले. हरित नाशिक आणि शाश्वत विकास यांचा ठोस संदेश देत या प्रदर्शनाने नाशिकच्या विकासयात्रेत एक महत्त्वाचे पाऊल टाकले, यात शंका नाही.



