मुंबई, दि. २१ जुलै २०२५ – Honey Trap Maharashtra राज्याच्या राजकारणात एका सामान्य कार्यकर्त्याच्या विधानाने खळबळ उडवली आहे. जळगावचे रहिवासी प्रफुल्ल लोढा यांनी वर्षभरापूर्वी भाजपमधील वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांना उद्देशून केलेल्या “एक बटण दाबलं की संपूर्ण देशात खळबळ उडेल” या विधानाचा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
हा व्हिडीओ खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स (X) हँडलवरून शेअर केला असून त्यांनी थेट प्रफुल्ल लोढा हा गिरीश महाजन यांचा ‘राजदार’ असल्याचा आरोप केला आहे. शिवाय माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीही प्रफुल्ल लोढाच्या हातात हनी ट्रॅप संदर्भातील संवेदनशील माहिती असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आता “प्रफुल्ल लोढा कोण?”, “त्याच्याकडे नेमकं काय आहे?” आणि “हे ‘बटण’ म्हणजे काय?” असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
एक बटण दाबलं की संपूर्ण देशात…
पुढे बोलताना याच प्रफुल्ल लोढा याने एक व्हिडिओ बनवला होता. त्यात त्याने अनेक तथ्यं मांडली आहेत. एक बटण दाबलं की संपूर्ण देशात हाहा:कार माजेल. पण मी कुणालातरी आई बोललो आहे आणि वहिनी बोललो आहे, असं त्याने या व्हिडिओ मध्ये सांगितले असल्याचाही दावा खडसे यांनी केलाय.
कोण आहे प्रफुल्ल लोढा?
प्रफुल्ल लोढा हा मूळचा जळगावचा रहिवासी. सुरुवातीस काँग्रेसमध्ये, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होता. नंतर त्याने भाजपमध्ये प्रवेश केला. याच पक्षप्रवेश सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामेश्वर नाईक उपस्थित होते, असं खडसे सांगतात. एक सामान्य कार्यकर्ता असलेला लोढा, गिरीश महाजन यांचा जवळचा झाला आणि यानंतर त्याचा आर्थिक उत्कर्ष झपाट्याने झाला, असा आरोप विरोधकांकडून होतोय.
व्हायरल व्हिडिओमधील ‘बटण'(Honey Trap Maharashtra)
प्रफुल्ल लोढाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे. त्यात तो स्पष्टपणे म्हणतो की, “एक बटण दाबलं तर देशभरात हाहाकार माजेल.” तसेच, मंत्री गिरीश महाजन यांना उद्देशून धमकी दिली आहे. या बटणाचं नेमकं काय स्वरूप आहे, हे स्पष्ट झालेलं नसून त्याच्या हातात असलेले व्हिडिओ किंवा पुरावे देशातील काही मोठ्या राजकीय, प्रशासकीय लोकांना अडचणीत आणू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
शिवसेना जमीनदोस्त करण्याची भाषा करणाऱ्या गिरीश महाजन यांना अर्पण
हनी ट्रॅप प्रकरणात अटकेत असलेले प्रफुल लोढा म्हणत आहे:एक बटन दाबले तर काय होईल? महाजन तुम्ही जमीनदोस्त व्हाल
@PMOIndia
@AmitShah
@Dev_Fadnavis
@girishdmahajan
@narendramodi pic.twitter.com/CSbFGirqm8— Sanjay Raut (@rautsanjay61) July 21, 2025
हनी ट्रॅप प्रकरणात नाव
सध्या राज्यात गाजत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाशीही प्रफुल्ल लोढाचे नाव जोडले गेले आहे. एकनाथ खडसे यांनी केलेल्या दाव्यानुसार, या प्रकरणात ७० पेक्षा जास्त आजी-माजी मंत्री आणि अधिकारी अडकले आहेत. अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून त्यांचे व्हिडीओ तयार करण्यात आले आणि नंतर ब्लॅकमेलिंग सुरू झाली, असा आरोप आहे. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होण्यासाठी एसआयटी गठीत करण्याची मागणीही झाली आहे.
बलात्कार व ब्लॅकमेलिंगचे आरोप
प्रफुल्ल लोढावर मुंबईतील अंधेरी आणि साकिनाका पोलीस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका प्रकरणात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार व ब्लॅकमेलिंगचे आरोप आहेत. दुसऱ्या प्रकरणात हनी ट्रॅप संदर्भात अमिष, अश्लील फोटो आणि धमकीसारख्या गंभीर बाबींचा समावेश आहे. खडसे यांनी याविषयीही सविस्तर माहिती दिली.
राजकीय घडामोडींना वेग
प्रफुल्ल लोढाच्या या प्रकरणामुळे गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्यावरही टीकेची झोड उठली आहे. लोढा याने मागच्यावर्षी महाजन आणि नाईक यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यामुळे त्यांच्या संबंधांत दुरावा निर्माण झाला. त्याचबरोबर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या “हनी ट्रॅप नाही” या वक्तव्यावरही संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित करत संबंधित फोटोची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
एकेकाळचा सामान्य कार्यकर्ता असलेला प्रफुल्ल लोढा आज राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण करतोय. त्याच्या ‘एक बटण’ विधानाने अनेकांना अस्वस्थ केलं आहे. हे बटण म्हणजे फक्त एक डिजिटल फाईल आहे का, की त्यामागे आणखी काही मोठं सत्य दडलंय, हे उघड व्हायचं बाकी आहे. सध्या तरी राज्यातील राजकीय वातावरण या प्रकरणामुळे अक्षरशः ढवळून निघालं आहे.
[…] सध्या मोठ्या घडामोडी घडत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मंत्रिमंडळात मोठा फेरबदल […]
[…] पहाटे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एकनाथ खडसे यांच्या जावयाला ताब्यात घेतल्याने […]