मुंबई – गानसाम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर या गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळातील अतीदक्षता विभागात आहेत. लतादीदींना करोना आणि न्युमोनिया झाल्याने त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. लतादीदींना जेव्हापासून इस्पितळात दाखल करण्यात आले होते, तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीची माहिती चाहत्यांना जाणून घ्यायची आहे. दरम्यान, लता दीदींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, दीदी यांची प्रकृती आधीच्या तुलनेत सुधारली आहे. दीदींची प्रकृती सुधारत असल्याने त्यांच्याबद्दलच्या खोट्या बातम्या पसरवणं कृपा करून थांबवा अशी विनंती मंगेशकर कुटुंबियांच्या प्रवक्त्या अनुषा श्रीनिवास अय्यर यांनी केली.
याआधीही नोव्हेंबर २०१९ मध्ये लतादीदींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्युमोनियाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना २८ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता.
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्यामते लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांना आणखी काही दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्या जेव्हा पूर्णपणे बऱ्या होतील तेव्हा त्यांना आयसीयूमधून बाहेर आणले जाईल. दरम्यान, याचवेळी मंगेशकर कुटुंबियांच्या प्रवक्त्या अनुषा श्रीनिवास अय्यर यांनी एक निवेद प्रसिद्ध केले.
अय्यर यांनी केली विनंती
लता मंगेशकर यांच्या प्रवक्त्या अनुषा श्रीनिवास अय्यर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबद्दलच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे, त्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. सध्या डॉ. प्रतीत समदानी आणि अन्य डॉक्टर दीदींवर उपचार करत आहेत. याआधीही मंगेशकर कुटुंबाच्यावतीने हे आवाहन करण्यात आले होते. कुटुंबाचा खासगीपणा जपण्याचेही आवाहन केले होते.
Singer Lata Mangeshkar is still in the ICU ward but there has been a slight improvement in her health today: Dr Pratit Samdani, who's treating her at Mumbai's Breach Candy Hospital
(file photo) pic.twitter.com/U5PkbWGp3T
— ANI (@ANI) January 22, 2022