जनस्थान च्या मानसरोवरात राजहंसाची मांदियाळी राहो – कवी अशोक बागवे
आज सायंकाळी ६ वाजता 'पंचतत्व' गाण्याचा कार्यक्रम
नाशिक – “जनस्थान या व्हाट्सअप ग्रुपला आठ वर्ष पूर्ण झाले, एका अर्थाने हा अष्टावधानी ग्रुप आहे. पाच कलांचा संगम असलेला हा सोहळा केवळ अद्वितिय आहे. कलाकारांचा उत्साह वाढवणारा आहे. जसा वारकऱ्यांचा सावळा विठ्ठल पंढरपुरी असतो तसाच आमचा गोरा विठ्ठल अर्थात वि वा शिरवाडकर हे इथे नाशिकला असायचे आणि म्हणूनच नाशिक मध्ये असलेल्या या अष्टावधानी जनस्थानचं मला विशेष कौतुक वाटतं. निसर्गाने समृद्ध केलेल्या कलांमधून माणूस म्हणून आपण समृद्ध व्हायला हव” हे अधोरेखित करतांनाच “दुसऱ्याचं कौतुक करण्यासाठी स्वतःला विसरून समर्पित करून काम करणारे आज-काल दुर्मिळ आहेत मात्र सौजन्यपूर्ण आणि बाह्य स्वरूप वेगळं असलं तरीही आतून जोडले गेलेले जनस्थान आणि त्यांना धरून ठेवणारा अभय ओझरकर यांच्या रूपाने जनस्थान च्या मानस सरोवरातील राजहंसांची मांदियाळी अशीच राहो!” अशी सदिच्छा आपल्या अध्यक्षीय भाषणात सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे यांनी दिली.
“कौतुकाला थोडी हेव्याची किनार असल्याशिवाय त्याला खरी खुमारी येत नाही” हे व.पु.काळेंचं सुप्रसिद्ध वाक्य खोटं ठरवणारा ‘जनस्थान फेस्टिवल’ नाशिककरांसाठी उत्साहात साजरा होत आहे. नाशिक मधील विविध क्षेत्रातील मान्यवर, अभ्यासक, गायक, वादक, नर्तक, चित्रकार , छायाचित्रकार, शिल्पकार, दिग्दर्शक, लेखक या जनस्थान व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य आहेत. ते सर्व गुण्यागोविंदाने राहतात,अडीअडचणीला एकमेकांसाठी धावून जातात आणि विशेष म्हणजे एकमेकांचं दिलखुलास कौतुक करण्याचं कारण शोधत असतात म्हणूनच जनस्थान व्हाट्सअप ग्रुपचा हा फेस्टिवल आगळा वेगळा ठरतो.
ग्रुप वर कायम नावीन्याची चर्चा होते, अनेक विषयांवर सुसंवाद होतो, पण या गोष्टी जनस्थान व्हाट्सअप ग्रुपपुरत्या मर्यादित न राहता त्याचा आपल्या नाशिककरांनाही आनंद घेता यावा, यासाठी “जनस्थान फेस्टिवल” आयोजित केला जातो. “कलाकाराला हवी असते ती दाद, त्याच्या कलेला हवी असते एक टाळी” याची जाणीव जनस्थान ग्रुपला कायम असते म्हणूनच कोरोना काळात जेव्हा कला सादर करण्याची संधी मिळत नव्हती, कलाकारांना व्यासपीठ मिळत नव्हतं, आर्थिक विवंचनेबरोबरच मानसिक घुसमट देखील वाढत होती, त्यावेळी जनस्थान ‘कलारंग’ (ऑनलाईन) च्या माध्यमातून कलाकारांना व्यासपीठ दिलं गेलं, त्यांच्या कलेला मनसोक्त दाद मिळाली, ज्यामुळे कला सादर करण्याचा त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आणि कलाकारांना नवसंजीवनी मिळाली. आता जनस्थान फेस्टिवलच्या माध्यमातून हा आनंद विनामूल्य संपूर्ण नाशिककरांसाठी खुला करून देण्यात आला आहे.
जनस्थान व्हाट्सअप ग्रुपचा आठवा वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्त “रंगतत्व” हे चित्र, शिल्प आणि छायाचित्रांचे प्रदर्शन कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये आयोजित करण्यात आलं होत, ज्याला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘जनस्थान फेस्टिवलच्या’ माध्यमातून राज्यस्तरीय तसंच देशपातळीवर नावाजलेल्या जनस्थानीय सदस्यांना “जनस्थान आयकॉन” पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. यावर्षी प्रसिद्ध अभिनेते-लेखक दीपक करंजीकर, ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या चळवळीचे प्रणेते विनायक रानडे, सुप्रसिद्ध कवी- गीतकार प्रकाश होळकर हे जनस्थान आयकॉन पुरस्कार 2022 चे मानकरी ठरले. सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे यांच्या शुभहस्ते दिमाखदार सोहळ्यात जनस्थान आयकॉन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
आजचा हा पुरस्कार कवी अशोक बागवे यांच्या हस्ते स्वीकारतांना विशेष आनंद होत असल्याचं ग्रंथ मित्र विनायक रानडे यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले. “तात्यासाहेबां सारखेच अशोक बागवे यांनी देखील माणसं वाचली आणि शब्दांकित केली. ग्रंथ मित्र म्हणून काम करताना अनेक लेखकांना, कवींना वाचकांपर्यंत पोचवणारा मी फक्त हमाल आहे पण आज माझ्या या कार्याची दखल घेऊन जनस्थान आयकॉन हा पुरस्कार मला दिला यासाठी मी आभारी आहे. जनस्थान हा परिवार असा आहे की जिथे व्यासपीठावर आणि प्रेक्षागृहात दोन्हीकडे सगळे ‘आदरणीय’ बसले आहेत. अशा मनाने मोठ्या आणि दुसऱ्यांचा विचार करणाऱ्या मंडळींमध्ये मिळणारा हा पुरस्कार ग्रंथपेटी भरणाऱ्या वॉचमनपासून, ती वाहून येणाऱ्या ड्रायव्हरचा, ती वितरित करणाऱ्या माझ्या मित्र परिवाराचा आहे.”असेही ते म्हणाले.
कवी प्रकाश होळकर यांनी ‘पुरस्कार जाहीर झाल्यावर आई-वडिलांची आठवण आल्याचं’ सांगतानाच जेव्हा होळकर यांनी पहिली कविता लिहिली तेव्हा त्यांच्या आई-वडिलांचा चेहरा कसा काळवंडला होता हा प्रसंग सांगितला. थेट मनातून निघणारे शब्द आणि त्या शब्दांमध्ये रूजलेला खोल अर्थ प्रेक्षागृहातल्या प्रत्येकाच्या काळजाला मिळत होता. प्रकाश होळकर यांनीही तात्यासाहेबांची आठवण काढली आणि ‘तात्यासाहेब मला यशवंत म्हणायचे’ हे आवर्जून सांगितलं. “सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला गुरु चांगले लाभले, ज्यांनी माझ्या कवितेची पहिल्यांदा छाटणी केली म्हणून मला वास्तववादी कविता करण्याची दृष्टी लाभली आणि माझ्या कवितेला बहर आला’’ असं त्यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले.
“१९८४ साली या नाट्यगृहात मी पहिल्यांदा नट म्हणून उभा राहिलो, आणि तिथेच आज हा जनस्थान आयकॉन पुरस्कार मिळाला तेव्हा एक वर्तुळ पूर्ण झालं असं मला वाटते. अशा अनेक वर्तुळांच्या कहाण्या आहेत. जेवढ्या मुक्त जाणिवा झेप घेतात तेवढ्याच सृजनाच्या कळ्या फुलतात म्हणूनच कलाकारांच्या जाणिवांना मुक्त व्यासपीठ देणार जनस्थान आणि त्यांच्यातर्फे दिला जाणारा जनस्थान आयकॉन हा पुरस्कार लाखमोलाचा असल्याचं” पुरस्कारार्थी लेखक व अभिनेते दीपक करंजीकर यांनी सांगितलं. “सृजनाचे सोहळे जेवढे जास्त होतात तेवढी समाजातली बकालता कमी होते.
सृजनाचा आधार घेऊन जगणं यातच जगण्याचे उत्तर आहे. ज्या ज्या जाणिवांनी आपण अस्वस्थ होतो, त्यातून कलानिर्मितीची जिद्द आपल्याला संपन्न बनवते पण त्यासाठी आपलं कुतूहल जागृत ठेवायला हव कारण कुतूहल सृजनता जन्माला घालतो. ‘जागर कलेचा’ हे ब्रीदवाक्य घेऊन जनस्थान व्हाट्सअप ग्रुप गेली आठ वर्ष सतत यासाठी प्रयत्नशील असतो. झाड मोठ झालं तरी आपण झाडाला नाही तर झाडाच्या मुळांना पाणी घालतो कारण मूळ एकमेकांमध्ये गुंतलेली असतात, एकमेकांना धरून असतात आणि हीच प्रेरणा आजच्या या पुरस्काराने मला दिली” असल्याचं दीपक करंजीकर यांनी मनोगतात सांगितलं.
कोरोनामुळे गेली दोन वर्ष हा सन्मान सोहळा संपन्न झाला नसला तरी मागील दोन वर्षात विविध क्षेत्रात नाव कमावणाऱ्या जनस्थानीय राजू देसले, भूषण मटकरी, रागिणी कामतीकर, महेश आंबेरकर, संकेत बरडिया, सुमुखी अथणी, राजा पाटेकर, संजय गीते, निवेदिता मदाने – वैशंपायन, दत्ता पाटील, क्षमा देशपांडे, ज्ञानेश्वर कासार, आनंद अत्रे, संदीप लोंढे, मिलिंद गांधी, सचिन शिंदे, अमोल पाळेकर, नुपूर सावजी यांचा विशेष सन्मान कवी अशोक बागवे यांच्या हस्ते करण्यात आला.
जनस्थान ग्रुपचे ॲडमिन अभय ओझरकर, स्वानंद बेदरकर, विनोद राठोड यांच्याबरोबर ग्रुपमधील काही जनस्थानीयांनी जनस्थान फेस्टिवलची आर्थिक बाजू सांभाळून घेतली.अमित कुलकर्णी, विश्वास को- ऑपरेटिव्ह बँक, अंबादास खैरे. डी.जे. हंसवाणी, विक्रांत चांदवडकर, जहागीरदार फूडस् चे मिलींद जहागिरदार, नीलेश भुतडा यांच्या विशेष सहकार्याने जनस्थान आयकॉन पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. या देखण्या सोहळ्याचे सूत्रसंचालन स्वानंद बेदरकर यांनी केले.
आज सायंकाळी ६ वाजता ‘पंचतत्व’ हा विषय घेऊन स्वतंत्रपणे विषय घेऊन गाण्याचा कार्यक्रम होणार आहे जनस्थानचे कवी गीतकार कवितालेखन करून त्याला ग्रुपमधील संगीततज्ज्ञ संगीत साज चढवीत आहेत.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेते दीपककरंजीकर अभिनेत्री विद्या करंजीकर करणार आहेत या सर्व कार्यक्रमाला प्रवेश खुला आहे.