“अंगठे आणि बदाम” कवितासंग्रहाचा अवर्णनीय प्रकाशन सोहळा.

श्रीराम वाघमारे

0

श्रीराम वाघमारे

रविवारी कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात “अंगठे आणि बदाम” या कैलास पाटील रचित कवितासंग्रहाच्या प्रकाशनाचा सोहळा अपार उत्साहात संपन्न झाला. हा सोहळा कसा झाला..? खरंतर हे शब्दांत सांगताच येणार नाही. ज्यांनी ज्यांनी हा सोहळा याची देही याची डोळा पाहिला, अनुभवला ते कदाचित या संदर्भात म्हणतील देखणा, रंगतदार, बहारदार, अविस्मरणीय आणि अदभुत..!

कुणी असंही म्हणेल, न भूतो न भविष्यति. पण हा सोहळा अवर्णनीय असा होता. कारण त्याचं नेमक्या शब्दांत वर्णन करताच येणार नाही.सर्वांनाच ज्याची प्रतीक्षा होती तो दिवस, तो क्षण अखेर उगवला. जो तो कुसुमाग्रज स्मारकाच्या दिशेने निघालेला होता. कार्यक्रमास विहित वेळेत पोहचून पण येण्यास तसा उशिराच झाला. हो, उशिरच. कारण मनाने प्रत्येकजण त्या आधीच येऊन पोहचला होता.

विशाखा सभागृहात प्रवेश करतांनाच तिथे काढलेली रांगोळी लक्ष वेधून घेत होती. सोशल मीडियावर वाचकांकडून भरपूर अंगठे आणि बदाम मिळवणाऱ्या कवी कैलास पाटील यांच्या कविता. म्हणूनच कविता lसंग्रहाचे ‘अंगठे आणि बदाम’ हे शीर्षक अगदीच समर्पक असे तर आहेच पण त्याचबरोबर ते नाविन्यपूर्ण देखील आहे. आणि या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा. म्हणूनच कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ निकिता गांगुर्डे हिने आपल्या रांगोळीतून हुबेहूब रेखाटले होते.

तर बाजूला
“माझ्या मनाच्या धूनीत
ज्यांनी पेटवला जाळ
त्यांच्या ऋणांनी झुकलं
माझ्या शब्दांचं आभाळ”

अशा काव्यमय ओळीत कैलास पाटील यांनी लोकेश शेवडे, स्वानंद बेदरकर, अभय ओझरकर, सचिन शिंदे, विनायक रानडे, विनोद राठोड, नीलकांती पाटेकर, केशव कासार, राजू देसले, दत्ता पाटील, प्रकाश होळकर, प्रशांत जुन्नरे, अजय निकम, ज्ञानेश्वर कासार, समीर देशपांडे, विजयाराजे भोसले, जय भोसले, प्रशांत साठे, अपर्णा क्षेमकल्याणी, सुभाष दसककर, मुकुंद कुलकर्णी, राजा पाटेकर, विजय साळवे, नंदकुमार देशपांडे, प्रवीण कांबळे, प्रसाद शुक्ल, निकिता गांगुर्डे, श्रीराम वाघमारे,रेखा केतकर जनस्थान परिवार आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान पदाधिकारी व कर्मचारी वृंद या स्नेहीजनांबद्दल व्यक्त केलेले ऋणनिर्देश काळजाला हात घालत होते.या मजकुराची कॅलिग्राफी प्रसाद शुक्ल यांनी केली.

 Indescribable release ceremony of "Angathe and Badam" poetry anthology.

सभागृहात तर अनेक मान्यवर स्थानापन्न झालेले होते. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील हे दिग्गज आपल्या कवीमित्राच्या प्रेमापोटी आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे वातावरणात अधिकच प्रसन्नता आणि चैतन्य पसरले गेले होते.

आणि स्वानंद बेदरकरने माईकचा आणि उपस्थितांच्या मनाचाही ताबा घेतला. या सूत्रसंचालकाचा आवाज आणि तो उच्चारत असलेले शब्द इतके अवीट गोडीचे होते की ऐकतांना ते अगदी कानांबरोबरच काळजात देखील साठवून घ्यावेसे वाटत होते.

श्री.विवेक गरुड यांच्याहस्ते उत्सवमूर्ती कैलास पाटील यांचा सन्मान करण्यात आला. त्या नंतर श्री. हेमंत टकले, ॲड.श्री.विलास लोणारी, श्री.सुनिल बागुल, श्री.शाहू खैरे, श्री. लक्ष्मण सावजी,विश्वास ठाकूर  इत्यादी मान्यवरांचा स्नेहरुपी सत्कार करण्यात आला.

“हे ईश्वरा तुझ्या सृष्टीला पुन्हा पूर्वीचा बहर दे,
दे संजीवन तुझ्या कृपने चैतन्याची लहर दे..’ ही कैलास पाटील रचित प्रार्थना गायक ज्ञानेश्वर कासार यांनी सादर केली. शब्द, सूर आणि ताल यांचा हा अनोखा संगम मन हेलावून गेला. तदनंतर ‘अंगठे आणि बदाम या कवितासंग्रहातील ‘कधी पाहिलीच नाही कशी आठवेल माय’, ‘माहित नाही’, ‘वाटलं ना.’. ‘उसवलीय मानवजात’, ‘पोरी जरा जपून चाल’, ‘तो बोलत नाही काही’, ‘किती सोसले चटके, किती झिजवली काया’, ‘ती फांदी कधी तुटू नये’, ‘मेंढरं’ , ‘कालच भेटली कविता’ या सारख्या निवडक कवितांचे सादरीकरण ध्वनिमुद्रित स्वरूपात नीलकांती पाटेकर यांनी तर थेट स्वरूपात विजय साळवे, अपर्णा क्षेमकल्याणी, प्रशांत साठे यांनी आपल्या खास शैलीत केले. यातील प्रत्येक कविता उपस्थितांची दाद घेऊन गेली.

कविता सादरीकरणानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘अंगठे आणि बदाम’चे प्रकाशन करण्यात आले. तो क्षण साऱ्या सभागृहाला दिपवून गेला. कैलास पाटील मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, या कविता ऐकतांना त्या आपल्याकडून लिहिल्या गेल्या आहेत यावर विश्र्वासच बसत नव्हता. हा कवितासंग्रह प्रकाशित होण्यासाठी ज्यांनी संपूर्ण आर्थिक भार उचलला त्या मकरंद महादेवकर, विकास गरुड आणि लोकेश शेवडे या तीन मित्रांचा त्यांनी अप्रत्यक्ष नामोल्लेख केला. कारण आपले नांव जाहीर करायचे नाही अशी गळ या मित्रांनी घातली होती. माजी नगरसेवक लक्ष्मण सावजी यांनी असे नमूद केले की आजवरच्या आयुष्यात जे अनुभवलं, जे सोसलं त्याच्या एक टक्का देखील या कविता नाहीत. कोरोनाच्या काळात अस्वस्थ झाले असताना लिहिलेल्या या कविता आहेत. अनेक विषयांवरील या कविता आहेत.

कैलास पाटील हे हॉटेल साहेबावरील फलकावर खवैय्यांना आकर्षित करण्यासाठी रोज चार ओळी लिहीत असत. आणि त्या वाचण्याची तिथे येणाऱ्या सगळ्यांना उत्सुकता असायची. आम्हाला आपल्या तालावर नाचायला लावणारा आमचा नृत्यदिग्दर्शक मित्र कवी झाला या शब्दांत माजी नगरसेवक शाहू खैरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर माजी आमदार हेमंत टाकले आपल्या मनोगतात म्हणाले की हा कवितासंग्रह वाचल्यानंतर कैलासलेणीच पहात असल्याची अनुभूती मिळाली.

कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुखअतिथी अर्थतज्ञ, अभिनेते दिपक करंजीकर या प्रसंगी म्हणाले की, या कवितासंग्रहाचे प्रकाशन होत आहे याचा त्यांना कैलास पाटील यांचे इतकाच आनंद होत आहे. कैलास पाटील यांचा रात्रीचा वावर हा इतरांपेक्षा अधिक डोळस असल्याने त्यांच्या कविता अधिक भावतात. त्यांची प्रत्येक कविता वेगळी असते.

सरतेशेवटी ज्यांच्या हस्ते कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले ते ख्यातनाम कवी श्री.अशोक बागवे यांच्या मनोगताने उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. ते म्हणाले वेदनेतून वेद निर्माण झाले. कविता देखील वेदनेतूनच जन्माला येते. कोरोनाच्या काळात जेव्हा जग सुन्न झाले होते तेव्हा वेदना कागदावर मांडण्याचे काम कवी कैलास पाटील यांनी केले. त्यांच्या प्रत्येक कवितेत शल्य दिसते. वेदना समजावून घेण्याची वृत्ती दिसते. तसेच माणूस केंद्रस्थानी दिसतो. ‘अंगठे आणि बदाम’ हा वेदनेतून आलेला काव्यसंग्रह आहे. ते पुढे म्हणाले काहीजण ४० वर्षे भेटूनहीं आपलेसे वाटत नाही तर काहीजण मात्र चार दिवसात आपलेसे वाटतात. कैलास पाटील हे त्यातीलच एक आहेत.

सर्वजण मनापासुन आणि भरभरून व्यक्त होत होते. कैलास पाटील यांच्या कितीतरी कविता आणि त्यांच्या कितीतरी आठवणींना उजाळा मिळत होता.
सुमारे अडीज-तीन तास रंगलेला हा सोहळा. वेळ कसा आणि कुठे गेला कोणालाच समजले नाही.

इतर पुस्तक प्रकाशनांचा सोहळा असतो तसा हा टिपिकल प्रकाशन सोहळा झाला नाही. त्यात निश्चितच वेगळेपण होतं. कवितांचं सादरीकरण, मान्यवर आणि प्रमुख अतिथी यांची मनोगतं खऱ्याअर्थाने तृप्ती देऊन गेली. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना विशेष भेट देण्यात आली.

सोहळ्याची सांगता झाली तरी हा सोहळा अंतर्मनात कुठेतरी रेंगाळत राहिला. अजूनही रेंगाळतोच आहे.!

आणि या सोहळ्यातच कैलास पाटील यांच्या पहिल्या कविता संग्रहाची पहिली आवृत्ती संपत आली. हे या सोहळ्याचे यश म्हणावे लागेल !

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.