लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर मधून ४०० उमेदवार रिंगणात उतरणार

ईव्हीएम विरोधी संघटनेची तयारी 

0

नागपूर,दि,१९ मार्च २०२४ – मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक उमेदवार उभे करण्याचा पवित्रा घेतल्या नंतर आता इंडिया अंगेंस्ट ईव्हीएम संघटना नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जनआंदोलनाच्या वतीने ४०० पेक्षा अधिक उमेदवार नामांकन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती इंडिया अगेंस्ट ईव्हीएमच्या राष्ट्रीय समन्वयक ऍड स्मिता कांबळे यांनी दिली. यामुळे आता  निवडणूक यंत्रणेवरील ताण वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

केंद्रीय केंद्रीय निवडणूक आयोगाला वारंवार पत्र देऊन सुद्धा आगामी लोकसभा निवडणूक ईव्हीएम च्या माध्यमातून घेण्याचा अट्टाहास निवडणूक आयोग करीत आहे.संपूर्ण देशात भाजप वगळता इतर सर्व पक्ष ईव्हीएम विरोधात असून जनतेत संताप असताना सुद्धा निवडणूक आयोग भाजपला पोषक धोरण अवलंबत आहे. यामुळेच निवडणूक आयोग हा मोदी निवडणूक आयोग झाला असल्याचा आरोप ऍड स्मिता कांबळे यांनी केला.

इंडिया अंगेंस्ट ईव्हीएम मार्फत गेले अनेक दिवस संविधान चौकात आंदोलन करण्यात आले.त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. सर्वसामान्य जनतेचा अधिकाधिक सहभाग असताना मतपत्रिकेवर निवडणूक घेतली जावी याकडे लक्ष वेधण्यासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी आमचा हा लढा आहे.सर्वसामान्य जनतेने लोकशाही वाचवण्यासाठी या लढ्यात सहभागी व्हायला हवे, अधिकाधिक मतदान करायला हवे असे आवाहन यावेळी माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांनी केले.

ते पुढे म्हणाले प्रत्येक ईव्हीएम मशीनला एक कंट्रोल युनिट असते.यावेळी निवडणूक आयोगाने एम ३ ईव्हीएम आणल्या असून या मशीन सहज हॅक होऊ शकतात. या मशीनला अधिकाधिक २४ बॅलेट युनिट जोडले जाऊ शकतात. एका बॅलेटवर १६ उमेदवारांचे नाव याप्रमाणे २४ बॅलेट युनिट व ३८४ उमेदवार येतात ३८४ पेक्षा अधिक संख्या उमेदवारांची असल्यास निवडणूक आयोगाला मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागणार आहे.हाच आमचा प्रयत्न आहे.

नागपूर,रामटेकसोबतच राज्यात आणि देशातील इतर मतदारसंघातही असा प्रयत्न व्हावा यादृष्टीने पाठपुरावा असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान,ईव्हीएम हॅक होऊ शकते या संदर्भात रविवारी २२ मार्च रोजी नागपुरात लाईव्ह प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार असून यावेळी जनतेला देखील मतदान करण्याची संधी दिली जाईल असे निमंत्रक प्रीतम प्रियदर्शी यांनी सांगितले.

देशाच्या लोकशाहीसाठी निवडणूक मतपत्रिकेच्या माध्यमातून व्हावी यासाठी सर्व पर्याय आम्ही वापरत आहोत.मात्र ईव्हीएम वरच निवडणूक झाली तर जनतेचा मतांचा टक्का किमान ८०% वर नेण्याचा, सर्वसामान्यांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. यावेळी मार्गदर्शक अमन कांबळे, विश्वास पाटील, ऍड आकाश मून, राज सुखदेव, भारत लोखंडे, अरुण भारशंक, राजेश लांजेवार, ऍड संतोष चव्हाण, ऍड आनंद मनोहर,राजीव झोडापे, ऍड भावना जेठे, आनंद पिल्लेवान, अजय बागडे, रितेश देशभ्रतार, मयुरी धुपे, अपर्णा चवरे, राहुल कांबळे, आदिती पाटील, हरीश लांजेवार आदी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.