इराण–इस्रायल युद्धाचा भारतावर परिणाम?कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय
उद्योग आणि हॉटेल व्यवसायावर परिणाम

पुणे,दि.६ मार्च २०२६ – Iran Israel War Impact मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण–इस्रायल–अमेरिका संघर्षाच्या झळा आता भारतातही जाणवू लागल्या आहेत. गॅस पुरवठ्यावर संभाव्य ताण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुण्यातील काही महत्त्वाच्या गॅस प्लांटमधून व्यावसायिक (Commercial) गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरगुती ग्राहकांना गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील बीपीसीएल प्लांट आणि चाकण येथील एचपीसीएल प्लांट येथून व्यावसायिक वापरासाठी दिले जाणारे गॅस सिलेंडर कालपासून देणे थांबवण्यात आले आहे. या संदर्भात दोन्ही कंपन्यांकडून डीलर्सना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, कमर्शियल सिलेंडरसाठी नवीन ऑर्डर स्वीकारू नयेत तसेच सिलेंडर उचलण्यासाठी गाड्या पाठवू नयेत.
डीलर्सना स्पष्ट सूचना
गॅस कंपन्यांनी दिलेल्या सूचनांनुसार, ५ किलो, ७ किलो, १९ किलो, ३५ किलो, ४७ किलो आणि ४२७ किलो क्षमतेचे व्यावसायिक सिलेंडर सध्या नवीन ऑर्डरवर देणे थांबवण्यात आले आहे. या निर्णयामुळे पुढील काही दिवसांत हॉटेल उद्योग आणि औद्योगिक क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कमर्शियल सिलेंडरचा वापर कुठे होतो?(Iran Israel War Impact )
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर मुख्यतः खालील ठिकाणी केला जातो –
हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स
कॅटरिंग व्यवसाय
औद्योगिक कामे – धातू वितळवणे, पावडर कोटिंग, उत्पादन प्रक्रिया
लहान उद्योग आणि वर्कशॉप्स
याशिवाय काही ठिकाणी ५ आणि ७ किलोचे छोटे सिलेंडर देखील वापरले जातात.
घरगुती गॅसला प्राधान्य
व्यावसायिक सिलेंडरवर सरकारकडून कोणतेही अनुदान दिले जात नाही. त्यामुळे त्याची किंमत घरगुती सिलेंडरपेक्षा अधिक असते. मात्र सध्याच्या परिस्थितीत घरगुती ग्राहकांना गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी कंपन्यांनी कमर्शियल सिलेंडरच्या वितरणावर तात्पुरती मर्यादा आणली आहे.
उद्योग आणि हॉटेल व्यवसायावर परिणाम
पुणे जिल्ह्यातील चाकण आणि शिक्रापूर परिसरातील प्लांटमधून देण्यात आलेल्या सूचनांमुळे आता हॉटेल व्यवसायिक आणि उद्योग क्षेत्राला उपलब्ध असलेल्या सध्याच्या स्टॉकवरच अवलंबून राहावे लागणार आहे. नवीन ऑर्डर पूर्णपणे बंद केल्यामुळे पुढील काही दिवसांत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.विशेषतः पुणे आणि आसपासच्या औद्योगिक पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर १९ ते ४७ किलोचे सिलेंडर वापरले जातात. त्यांचा पुरवठा थांबल्यास उत्पादन प्रक्रियेवरही परिणाम होऊ शकतो.
युद्धाचा जागतिक परिणाम
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे तेल आणि गॅस पुरवठ्यावर जागतिक स्तरावर ताण निर्माण होत आहे. आखाती देशांमधून येणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाल्यास त्याचे परिणाम भारतासारख्या आयातदार देशांवर दिसू शकतात.
त्यामुळे कंपन्यांनी सध्या सावध भूमिका घेत कमर्शियल सिलेंडरच्या ऑर्डर तात्पुरत्या थांबवल्या असल्याचे सांगितले जात आहे.
पुढील निर्णय महत्त्वाचा
सध्या उपलब्ध असलेला गॅस स्टॉकच हॉटेल व्यवसायिक आणि उद्योग क्षेत्राला वितरित केला जाणार आहे. मात्र मध्यपूर्वेतील युद्ध किती काळ चालते आणि पुरवठा साखळीवर किती परिणाम होतो, यावर पुढील निर्णय अवलंबून राहणार आहे.परिस्थिती लांबली तर हॉटेल उद्योग, कॅटरिंग व्यवसाय आणि लघुउद्योगांवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

