आयटीचे छापे : ५८ कोटी रोकड,३२ किलो सोने सुमारे ३९० कोटीची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस

0

जालना – महाराष्ट्रात स्टिल उत्पादनामध्ये सर्वाधिक लोखंडी गज उत्पादित करणाऱ्या जालना येथील स्टील कारखानदारांच्या घरं,कारखान्यांवर,तसेच कार्यालयांवर आयकर विभागाने छापेमारी केली. विभागाने केलेल्या या छाप्यांमध्ये सुमारे ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे. त्यात ५८ कोटींची रोख रक्कम , ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा जवळपास  १६ कोटींचा ऐवज तसेच सुमारे ३०० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या कागदपत्रांसह महत्त्वाचा दस्तऐवज जप्त करण्यात आला. ज्यांच्यावर कारवाई झाली त्यात औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे.

एखाद्या चित्रपटाला लाजवले असा हा छापा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जालन्यामध्ये टाकला आहे . छापा टाकण्यासाठी येत असल्याची खबर कुणाला लागू नये म्हणून आयकर विभागाचे अधिकारी चक्क वऱ्हाडी बनून आले होते. दुल्हन हम ले जायेंगे असे स्टिकर असलेल्या लग्नाच्या गाड्यांमध्ये आयकर विभागाचे अधिकारी जालन्यात पोहोचले आणि १ ते ८ ऑगस्टपर्यंत  छापे मारून ३९० कोटी बेनामी संपत्तीचा पर्दाफाश केला.

विशेष म्हणजे ही रक्कम  मोजण्यासाठी आयकर विभागाच्या पथकाला तब्बल १३ तास लागले.या कारवाईसाठी नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील २६० अधिकाऱ्यांसह कर्मचारी १२० हून अधिक वाहनांच्या ताफ्याद्वारे जालन्यात पोहोचले होते. जालन्यात मिळालेली ही राेकड स्थानिक स्टेट बँकेत नेऊन माेजण्यात आली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली माेजणी रात्री १ वाजता पूर्ण झाली.

आयकर विभागाच्या औरंगाबादच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार,जालना येथील चार बड्या स्टील कारखानदारांनी कोट्यवधी रुपयांचे जादा उत्पन्न व्यवसायातून मिळवत ते पूर्णपणे रेकॉर्डवर न आणता रोखीत व्यवहार केले आहेत.आयकर विभागाला या कारवाईत सुरुवातीला काहीच हाती लागले नाही. त्यामुळे या पथकांनी त्यांच्या शहराबाहेरील आठ ते दहा किलोमीटरवरील फार्महाऊसकडे मोर्चा वळवला. तेथे बिछान्यांमध्ये, कपाटांखाली, तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड सापडली. सर्वत्र नोटांची बंडलेच बंडले आढळली.

आणखी एका व्यावसायिकाच्या घरीही अशीच रक्कम सापडली.आयकर विभागाने या व्यापाऱ्यांची घरे, कार्यालयांतून वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या शेती, बंगले ,जमिनी, यांसह बँकांतील ठेवी, इतर व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली. एकूण सुमारे ३०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळल्याचा दावा या पथकाने केला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!