आमदारांचा पाठिंबा कोणाला थोड्याच वेळात होणार स्पष्ट
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे आज मुंबईत शक्तिप्रदर्शन
मुंबई,दि.५ जुलै २०२३ –शिवसेने नंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडली आहे.अजित पवार यांच्यासह ९ जण राज्यमंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर आमदारांचा मोठा गट अजित पवार यांच्या सोबत असल्याचा दावा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या स्वतंत्र बैठका होणार आहे.
एकीकडे अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची आज सकाळी ११ वाजता बैठक बोलवलीय. तर दुसरीकडे शरद पवार यांनीही राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक दुपारी १ वाजता आयोजित केलीय. तसे व्हिपही बजावण्यात आलेत. मात्र दोघांपैकी कुणाच्या बैठकीला जायचं, यावरून राष्ट्रवादीचे आमदार चांगलेच कात्रीत सापडलेत. अजित पवार यांनी वांद्रे येथील एमईटी कॉलेजमध्ये बैठक बोलवली आहे, त्यासाठी प्रतोद अनिल पाटील यांनी व्हिप जारी केलाय. तर शरद पवार यांनी वायबी सेंटरमध्ये बैठक बोलवलीय. त्यासाठी प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हिप जारी केलाय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोणत्या बैठकीला जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रविवारी भूकंप झाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांचे आज मुंबईत शक्तिप्रदर्शन होत असून, शरद पवार आणि अजित पवार यांनी त्यासाठी बैठका बोलावल्या आहेत.त्यामुळे आमदारांची कोंडी झाली आहे. दरम्यान, आजच्या बैठकीतून काका – पुतण्याच्या गटात नक्की कीती आमदार आहेत हे स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादीच्या ‘दोन’ बैठकांमुळे राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही गटांना किती आमदारांचा पाठिंबा आहे हे आजच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार असल्याने सर्वांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.दरम्यान, अजित पवार यांनी बोलावलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीपूर्वी अजित पवार यांच्या समर्थकांनी त्यांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली.