संकल्पना अभय ओझरकर, भक्कम पाठींबा स्वानंद बेदरकर आणि विनोद राठोड यांच्या विचारधारेतून २४ जून २०१४ रोजी निर्माण झालेला हा समूह ९ वर्षांची यशस्वी वाटचाल करून १० व्या वर्षात प्रवेशता झाला, ही बाब निश्चितपणे ‘कौतुकास्पद, नोंदनीय आणि प्रेरणादायी ठरते.
नाशिक शहराला कलेची परंपरा असूनही व्यावसायिकतेचा अभाव बहुतांशी प्रत्येकाला प्रकर्षाने जाणवतो. शहरातील विविध संस्था ‘नाटक, सिनेमा, मालिका, संगीत, नृत्य, चित्रकला आणि तंत्रज्ञान’ या दिवसांगणिक प्रगल्भ होणाऱ्या कलाक्षेत्रात आपापल्या परीने योगदान देतच आहेत. परंतु कलाकारांच्या विलीगीकरणामुळे ‘ठोस, भक्कम, गुणवत्तापूर्ण आणि नोंदनीय’ अशी कलाकृती शहर परिघाबाहेर दुमदुमतांना दिसत नाही, ही एक शोकांतिकाच आहे.
हाच ‘विचार आणि धागा’ जनस्थान या संकल्पनेला जन्म देण्यास उद्युक्त करतो. समूहाची बांधणी करतांना ‘मुख्य उद्देश, धेय्य आणि लक्ष्य’ यांच्या संलग्नता आणि समर्पणाची भावना बाळगणारे निवडक आणि निमंत्रित सदस्य हा निकष आजही कायम राखल्याने गत ९ वर्षांचा प्रवास एका ठराविक गतीने यशाचा मार्ग चोखाळताना दिसतो. सोबतच विविध प्रकारच्या आयोजनातून सदस्यांच्या इतर आवडी-निवडी जपतांनाही दिसतो. आपली ‘प्रतिमा, यशस्विता, प्रसिद्धी’ यांची झूल झटकून प्रवेश करणे, हा एकमेव नियम. प्रत्येकाला व्यक्त होण्याची मुभा देतांनाच इतरांचा सुयोग्य सन्मान करण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच.
समाज अशा संस्थांच्या एकुणात वाटचालीचा परामर्श घेतच असतो आणि केवळ त्याचमुळे कोणत्याही कार्यक्रमाच्या आयोजनात आर्थिक गरजा आपोआप पूर्ण होत गेल्या आणि सलग नऊ वर्षे हा समूह ‘एकता, एकात्मता आणि एकतानता’ यांनी बांधला गेला आहे.
या वर्षी वर्धापन दिनाच्या निमित्ताने नवीन संकल्पनांची भर पडल्यास नवल ते काय?
सालाबाद प्रमाणे यंदाही ‘आयकॉन’ पुरस्कार सोहळा आयोजित केला आणि तीन ऐवजी चार पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली. तद्वतच चार, पाच ऐवजी तब्बल सात दिवस या सोहळ्याचा आनंद नाशिककरांनी घेतला.
१८ ते २१ जून या कालावधीत कुसुमाग्रज स्मारक येथे चित्र-शिल्प प्रदर्शन, २२ जून रोजी प.सा. नाट्यगृह येथे आयकॉन पुरस्कार सोहळा, २३ जून रोजी ‘नात्यास नाव अपुल्या’ हा कवितांवर आधारित नाट्याविष्कार सादर झाला, २४ जून रोजी ‘ नैनो में बदराछाये’ हा शास्त्रीय संगीतावर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. याच दरम्यान ‘जनस्थान’ चे नवीन ‘टायटल सॉंग’ प्रदर्शित करण्यात आले.
एकुणात या समूहाची यशस्विता बघता नाशिककरांच्या, कलाकारांच्या आणि महाराष्ट्राच्या अपेक्षा वाढली आहेत. येत्या वर्षभरात ‘जनस्थान’ व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करेल, अशी आशा!
एनसी देशपांडे (मोबाईल-+919403499654)
