जनस्थान आयोजित आठवणीतील चहा उपक्रमात मान्यवर जुन्या आठवणीत रममान…

0

नाशिक,दि, २० जानेवारी २०२४ – सकाळची बोचरी थंडी ,कॉलेज जीवनातील आठवणी, जुन्या मित्रांच्या भेटी, सोबतीला वाफाळलेला चहा, आणि आठवणीमध्ये मित्रमंडळी पुन्हा एकदा कॉलेज रोडवरील सलीम टी स्टॉल येथे रममान झाले. निमित्त होते जनस्थान या कलावंतांच्या ग्रुप तर्फे खास आठवणीतील चहा या अभिनव उपक्रमाचे. नाशिक मधील प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, राजकीय नेतेमंडळी, कलाक्षेत्रातील मान्यवर कलाकार, कॉलेजमधील तरुण मंडळी, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती सलीम टी स्टॉल या ठिकाणी येऊन आठवणीतील चहा या उपक्रमास चहा पीत मित्रांसमवेत गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

जनस्थान या कलावंतांच्या आणि ११.३० @ सलीम या ग्रुप तर्फे खास आठवणीतील चहा या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे हे सहावे वर्ष होते. यावर्षीच्या आठवणीतील चहा उपक्रमात नाशिक मधील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच चहा सोबतच्या आठवणी सर्वांसमवेत शेअर केल्या.

माणसांच्या शेवटपर्यंत येते ती म्हणजे आठवण. आठवणीच्या पलीकडे माणसांकडे काहीच राहत नाही.असाच एक उपक्रम म्हणजे आठवणीतील चहा सलीम मामा टी स्टॉल हे नाशिक मधील फार महत्त्वाचं नाव आहे. ज्या नावाशिवाय कॉलेज पासून सुरू झालेल आयुष्य ते संपत असे पर्यंत सलीमच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अशा या नावासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी आठवणीतील चहा सोबत गप्पांसह गायन व वादनाचा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता. नाशिक मधील कलाकारांनी गायन व वादनासह या कार्यक्रमात रंगत आणली व सर्व उपस्थितांचे मनोरंजन केले.सहभागी कलावंतांचा सुप्रसिद्ध अभिनेता कांचन पगारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अभिनेते व कवी सौमित्र ( किशोर कदम ) यांनी सलीम टी स्टॉल येथे चहा पित आठवणींना उजाळा दिला. त्यांनी चहा पीत असताना प्रियसीच्या लग्नाची पत्रिका हातात पडते यावरील सुंदर कविता सर्वांसमोर सादर करून दाद मिळवली.

Janasthan Group/Dignitaries reminisce about the old memories in the memory tea activity organized by Janasthan...

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी सांगितले की नेहमी आम्हाला वेगळ्या लोकांबरोबर राहावे लागते. परंतु आज नाशिक मधील कला क्षेत्रातील लोकांबरोबर राहून खूप छान वाटते आहे. तसेच त्यांनी आपली पुण्यामध्ये कॉलेजमधे असतानाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले कॉलेजमध्ये असताना मी व माझा मित्र असे दोघे कॉलेजच्या समोरील चहाच्या टपरीवर चहा पीत असे. आम्हाला तेव्हा चहा व डोनट असे संबोधले जाई. या खात्यात आल्यानंतर ज्यावेळेस पुण्यामध्ये माझी बदली झाली. तेव्हा १९ वर्षानंतर मी त्या दुकानात गेलो. चहा पीत असताना चहा वाल्यानी विचारले आज तुमचा मित्र सोबत नाही आला ? तेव्हा पुन्हा १९ वर्ष पाठीमागे जाऊन त्या दिवसांची आठवण झाली होती.

आदिवासी विकास महामंडळाच्या लीना बनसोड यांनी सांगितले की दोन वर्षांपूर्वी जेव्हा माझी नाशिक मध्ये बदली झाली होती , तेव्हा मला ऑफिस मधील लोकांनी नाशिक मधील प्रसिद्ध ठिकाणे सांगितले होते. त्यात बुधा हलवाई व सलीम स्टॉल याठिकाणी आवर्जून भेट द्यावी असे त्यावेळी सांगितलं होतं. मी स्वतः जरी चहा जास्त पीत नसली तरी माझे वडील जे ९५ वर्षाचे आहे. ते चहाचे खूप मोठे भक्त आहे. त्यानंतर लीना बनसोड यांनी आपल्या वडिलांना गाडीतून उतरून कार्यक्रम स्थळी आणून सलीम स्टॉल मधील चहा प्यायला दिला. त्यांनी सांगितले की नाशिककर वेगवेगळे उपक्रम राबवण्यात निष्णात आहे. आमची प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली कुठेही झाली तरीही नाशिककर आपल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमांमुळे आम्हाला नेहमी आठवत राहतील.

ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी आपल्या कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले कॉलेजमध्ये येत असताना येथे कुठल्याही प्रकारची वस्ती नव्हती. फक्त दोन-तीन बंगले होते आणि सलीम चा टी स्टॉल होता. येथे मित्रांसोबत आम्ही रोज चहा पीत पीत गप्पा मारत असे. त्यावेळेला आम्ही सायकलीवरून कॉलेजला येत असू. ग्रामीण पोलीस उपाधीक्षक माधुरी कांगणे यांनी सांगितले दिवसाला एक वेळ जेवण मिळालं नाही तर चालेल परंतु दोन-तीन वेळा चहा होत असतो. एवढी मी चहाची चहाती आहे. असे सांगितले. दत्तात्रय कोठावदे यांनी पत्र वाचन करून उपस्थितांचे मन जिंकले

गंगापूर रोड पोलीस स्टेशनच्या नवनियुक्त निरीक्षक पोलीस तृप्ती सोनवणे यांनी सांगितले, कॉलेजमध्ये असताना आम्ही सलीम स्टॉलवर येत असू. तेव्हा हे दुकान नव्हते तर स्टॉल बाजूला लागत होता ही आठवण त्यांनी आवर्जून सांगितले. ज्येष्ठ नाट्य लेखक व दिग्दर्शक विवेक गरुड यांनी चहा वरील कविता सादर केली. चहा शिवाय लेखणीला काही सुचत नाही अशा अशयावरील वरील ती कविता होती. नाशिक मधील चित्रपट व मालिकांमध्ये कलाकार अपर्णा क्षेमकल्याणी यांनी त्यांच्या आयुष्यातील जोडीदार यांचा भेटीतील चहा बरोबर जोडीदाराने जी कविता ऐकवली होती ती कविता सादर केली व जुन्या आठवणींना उजाळा दिला. नाशिक शहर पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनीही त्यांच्या चहा च्या आठवणी शेअर केल्या, याप्रसंगी फ्रावशी अकॅडमीचे रतन लथ पंचवटी हॉटेल्स ग्रुपचे श्री व सौ अतुल चांडक, ज्येष्ठ नेते शाहू खैरे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार,सुरेश अण्णा पाटील,उदय सांगळे,वैद्य विक्रांत जाधव,अदिती गायकवाड, जनस्थानच्या सदस्यांसह नाशिक शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनस्थानचें प्रमुख अभय ओझरकर,आर जे भूषण मठकरी,रवी जन्नावार,विनोद राठोड,प्रसाद गर्भे यांनी परिश्रम घेतले.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.