जनस्थानचे आयकॉन पुरस्कार जाहीर:कांचन पगारे,नितीन पवार,नंदन दीक्षित,दत्ता पाटील यांचा होणार सन्मान
अभिनेते ,दिग्दर्शक विजय गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार सन्मान
नाशिक .दि,१५ जून २०२४ –नाशिकच्या सांस्कृतिक जीवनात आधुनिक साधनांच्या उपयोगाने नवीन पर्व सुरू करणाऱ्या ‘जनस्थान’ग्रुपचा दहावा वर्धापनदिन दिनांक १६ जून ते २२ यादरम्यान नाशिकमध्ये साजरा होत असून त्या दरम्यान दिल्या जाणाऱ्या आयकॉन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेते कांचन पगारे, ज्येष्ठ तबलावादक नीतीन पवार, ज्येष्ठ चित्रकार आणि जाहिराततज्ञ नंदन दीक्षित, नाटककार दत्ता पाटील यांना यंदा सन्मानित करण्यात येणार आहे.अशी माहिती ग्रुपचे प्रमुख अभय ओझरकर यांनी दिली.
या सोहळ्यासाठी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सिने,नाट्य अभिनेते विजय गोखले येणार असून त्यांच्या ज्ञानाला आणि अनुभवांना ऐकण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे
‘जनस्थान’हा व्हाट्सअप ग्रुप दरवर्षी आपला वर्धापनदिन अनोख्या पद्धतीने साजरा करतो. यंदाही हा सात दिवस चालणारा उत्सव नाशिकमध्ये साजरा होत असून यात दि. २० रोजी सायंकाळी सहा वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित सोहळ्यात हा जनस्थान आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
नाशिकच्या सांस्कृतिक कला जीवनामध्ये आपल्या कलेच्या सेवेतून योगदान देणाऱ्या देणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविले जाते.यंदा ज्येष्ठ तबलावादक नितीन पवार यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पवार तबला अकादमीच्या माध्यमातून नाशिकमध्ये भानुदासजी पवार यांनी रुजविलेली तबला शिक्षणाची बीजे नितीन पवार यांनी जीवापाड सांभाळली, वाढवली. त्यांचा मोठा शिष्यपरिवार आहे अनेक नामवंत गायकांना वादकांना त्यांनी साथ संगत केली असून त्यांच्या याच योगदानाचा विचार करण्यात आला आहे.
नंदन दीक्षित एक अष्टपैलू कलावंत असून चित्रकला हा त्यांचा मुख्य विषय आहे. त्याचबरोबर निर्मिती एडवर्टाइजिंगच्या माध्यमातून त्यांनी आजवर हजारो जाहिराती केल्या असून त्यासाठी नाशिकच्या भूमीमध्ये एक स्वतंत्र चळवळच रुजवली आहे. त्याचबरोबर कुसुमाग्रज वाचनालय, संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांस्कृतिकतेच्या प्रांतातही स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
दत्ता पाटील हे गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ मराठी नाट्यक्षेत्रात सक्रिय असून पत्रकारिता, नाट्यलेखन, आकाशवाणी अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा संचार आहे. ग्रामीण जीवनाचा वेध घेत आजच्या काळात माणसाचे माणूसपण नेमके कुठे हरवले आहे; याचा शोध आजवर ते नाट्यकृतीतून घेत आले. राज्यस्तरीय अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला असून त्यांच्या याच वैविध्यपूर्ण योगदानासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
कांचन पगारे हे सध्याच्या हिंदी -मराठी जाहिरात क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव असून आपल्या अनोख्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी आपले स्वतंत्र स्थान जाहिरात विश्वात निर्माण केले आहे. ज्या जाहिराती मराठी कलावंतांना मिळणे दुरापास्त मानले जात होते; अशा ब्रॅण्डेड जाहिरातींसाठी कांचन पगारे यांना सर्वत्र मागणी आहे. मूळचे नाशिककर असूनही बाहेर राहून नाशिकचे नाव मोठे करण्यात पगारे यांचा वाटा महत्त्वाचा आहे.
या चौघांनाही ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. यापूर्वीच्या जनस्थान सोहळ्यासाठी असेच मान्यवर प्रमुख पाहुणे लाभले होते. त्यात राजदत्त, मिलिंद गुणाजी, अरुण नलावडे,अशोक समेळ,अशोक बागवे, प्रमोद पवार आदी मान्यवरांचा समावेश आहे.
त्यामुळे या अनोख्या महोत्सवाचा नाशिककरांनी आनंद घ्यावा असे आवाहन ग्रुपचे प्रमुख अभय ओझरकर, विनोद राठोड आणि स्वानंद बेदरकर यांनी केले आहे.या कार्यक्रमासाठी दीपक बिल्डर्स चे दीपक चंदे, एस डब्लू एस चे रघुवीर अधिकारी ,गोपाळ पाटील,रेडिओ मिर्चि,राजेश पिंगळे,हॉटेल पंचवटी यात्रीचे भुतडा,सचिन गीते यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.