जनस्थान महोत्सवाला आजपासून प्रारंभ
चित्र-शिल्प प्रदर्शनाचे ज्येष्ठ व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांच्या हस्ते उद्घाटन
नाशिक –‘जनस्थान’ हा व्हाट्सअप ग्रुप दरवर्षी आपला वर्धापनदिन अनोख्या पद्धतीने साजरा करतो. यंदाही हा पाच दिवस चालणारा उत्सव नाशिकमध्ये साजरा होत असून यात आज आणि उद्या म्हणजेच दि. २० व २१ असे दोन दिवस ‘रंगतत्त्व’ या चित्र – शिल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कुसुमाग्रज स्मारकातील कलादालनात भरणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन आज सकाळी १०:३० वाजता ज्येष्ठ व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांच्या हस्ते होणार आहे. जनस्थानचे सदस्य व नुकतेच ज्यांचे निधन झाले ते अक्षर सुलेखनकार नंदू गवांदे यांचे नाव या कलादालनाला दिले जाणार आहे. यावेळी विनायक रानडे हे सोनार यांची मुलाखत घेतील.
यावर्षीच्या महोत्सवाचे सूत्र ‘पंचतत्व’ या विषयावर आधारित आहे. त्यामुळे या चित्र-शिल्प प्रदर्शनातील चित्राकृती देखील याच विषयावर असतील. यावेळी शिल्पकार दोन दिवस प्रत्यक्ष शिल्प निर्मिती करून दाखवणार आहेत.
या प्रदर्शनात अनिल माळी, अतुल भालेराव, सी.एल. कुलकर्णी, केशव कासार, धनंजय गोवर्धने, प्रफुल्ल सावंत, राजा पाटेकर, राजेश सावंत, शीतल सोनवणे, स्नेहल एकबोटे, संदीप लोंढे, श्रेयस गर्गे, श्याम लोंढे, यतिन पंडित यांचे चित्र – शिल्प असतील.
कार्यक्रमास अमित कुलकर्णी, विश्वास को ऑप बँक, डी. जे. हंसवानी,अंबादास खैरे, विक्रांत चांदवडकर, मिलिंद जहागिरदार नीलेश भुतडा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. कुसागग्रज प्रतिष्ठाननेही या दोन दिवसीय प्रदर्शनासाठी विशेष सहकार्य केले आहे.या अनोख्या प्रदर्शनाचा नाशिककरांनी आनंद घ्यावा असे आवाहन ग्रुपचे प्रमुख अभय ओझरकर यांनी केले आहे.