

अभय ओझरकर
(Journalism and Power)पत्रकारिता हा समाजव्यवस्थेचा चवथा आधारस्तंभ म्हणून सर्वश्रुत आहे. लोकशाही व्यवस्थेत विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका या तीन स्तंभांवर अंकुश ठेवण्याचे महत्त्वाचे काम पत्रकारितेकडे सोपवले गेले आहे. समाजाचा आरसा म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जाते. सामान्य जनतेचे प्रश्न, त्यांचे दुःख, अन्याय, अपेक्षा आणि आकांक्षा सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकारितेने अनेक दशकं प्रामाणिकपणे केले. त्यामुळेच पत्रकारितेला लोकशाही मजबूत करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक मानले गेले.
मात्र बदलत्या काळात पत्रकारितेकडे पाहण्याचा जनतेचा दृष्टिकोन झपाट्याने बदलत चालला आहे. लोकांचा आवाज बनलेली पत्रकारिता आता हळूहळू एक इंडस्ट्री म्हणून पाहिली जाऊ लागली आहे. विशेषतः निवडणुकांच्या काळात रंगवून दिलेल्या बातम्या, एकतर्फी सर्वेक्षणे, ठरावीक उमेदवार किंवा पक्षाच्या बाजूने उभे केलेले कथानक आणि त्या बातम्यांना येणारा राजकीय वास जनता आता सहज ओळखू लागली आहे. परिणामी पत्रकारितेवरील विश्वासाला तडे जात असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येते.
बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि पत्रकारितेतही बदल होणे अपरिहार्य आहे. पूर्वी हातात लेखणी, वही आणि कॅमेऱ्यासह रस्त्यावर उतरलेला पत्रकार आज लॅपटॉप, टॅब आणि मोबाईलच्या सहाय्याने काम करत आहे. तंत्रज्ञानामुळे बातम्या क्षणात जनतेपर्यंत पोहोचू लागल्या, ही नक्कीच सकारात्मक बाब आहे. मात्र या वेगाच्या स्पर्धेत बातमीची सत्यता, पार्श्वभूमी, संदर्भ आणि परिणाम यांची शहानिशा करण्याची परंपरा हळूहळू मागे पडत चालली आहे.
(Journalism and Power)आज “माझा पेपर”, “माझा चॅनल”, “माझं पोर्टल” या स्पर्धेत घटना नेमकी काय आहे यापेक्षा ती किती लवकर ‘ब्रेकिंग न्यूज’ करता येईल, यालाच अधिक महत्त्व दिले जाते. सत्य पडताळणीपेक्षा सनसनाटीपणा आणि टीआरपी महत्त्वाचा ठरू लागला आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे तर परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. मोबाईल हातात, चार ओळींची पोस्ट, थोडा आक्रोश आणि थेट लाईव्ह—इतक्यातच पत्रकार झाल्याचा गैरसमज अनेकांना होऊ लागला आहे. यामुळे व्यावसायिक पत्रकारिता आणि जबाबदारीची संकल्पनाच धूसर होत चालली आहे.
या सगळ्या गोंधळात अजून भर घातली ती राजकारण्यांनी. काही पत्रकारांना त्यांनी आपल्या प्रभावाखाली ओढले. माहिती, संपर्क, प्रसिद्धी आणि ओळखीचा वापर करून पत्रकारांना वेगवेगळी आमिषे दाखवली गेली. यातून काही पत्रकारांना खुर्चीचे, पदाचे आणि थेट निवडणुकीतील तिकीटाचे स्वप्न पडू लागले. ज्यावर आपली उपजीविका चालते, त्या पत्रकारितेलाच खुंटीवर टांगून काही पत्रकार राजकीय उदोउदो करण्यात व्यस्त झाले.
महापालिका निवडणुका असोत किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका—तिकीट मिळेल या अपेक्षेने काही पत्रकारांनी थेट राजकीय काम सुरू केले. पत्रकारितेचा मूलमंत्र असलेला “सोर्स” या काळात राजकारण्यांसाठी अधिकच उपयुक्त ठरला. पत्रकारांकडून मिळणारी अंतर्गत माहिती, नेत्यांच्या हालचाली, पक्षांतर्गत मतभेद, विरोधकांचे डावपेच या सगळ्या गोष्टी राजकारण्यांनी अचूकपणे जाणून घेतल्या. मात्र जेव्हा निवडणुकीचे तिकीट जाहीर करण्याची वेळ आली, तेव्हा या पत्रकारांच्या हाती निराशाच आली—वाटाण्याच्या अक्षदा.
असाच प्रकार नाशिकमध्येही पाहायला मिळाला. गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय असलेल्या काही पत्रकारांना अचानक नेते बनायचे डोहाळे लागले. त्यांनी आपली पत्रकारिता बाजूला ठेवून इच्छुकांच्या रांगेत उडी घेतली. तिघांपैकी दोघे स्थानिक न्यूज चॅनलशी संबंधित होते, तर एक राष्ट्रीय स्तरावरील दैनिकाचा पत्रकार होता. नेते बनण्याची इच्छा इतकी तीव्र होती की त्या दैनिकाच्या पत्रकाराने थेट नोकरीचा राजीनामा दिला, तर उर्वरित दोघांनी आपले चॅनल संबंधित पक्षासाठी समर्पित केल्यासारखी भूमिका घेतली. मात्र निवडणुकीचे तिकीट जाहीर झाल्यानंतर या सगळ्यांच्या पदरी निराशाच आली.
या घटनांमधून एक महत्त्वाचा धडा समोर येतो. पत्रकार हा सत्तेचा भाग होण्यासाठी नसतो, तर सत्तेवर प्रश्न विचारण्यासाठी असतो. पत्रकारितेची खरी ताकद खुर्चीत नसून लेखणीत असते. पत्रकाराने “किंग” होण्यापेक्षा “किंगमेकर” होणे अपेक्षित असते. चांगल्या, प्रामाणिक आणि सक्षम व्यक्तींना पुढे आणणे, अन्याय उघड करणे आणि लोकहित जपणे हेच पत्रकारितेचे खरे काम आहे.
जर पत्रकारिता आपला मूळ धर्म विसरली, तर तीच पत्रकारिता राजकीय खेळाची बळी ठरते. त्यामुळे पत्रकारितेचा चवथा आधारस्तंभ मजबूत ठेवायचा असेल, तर प्रामाणिकपणा, स्वायत्तता आणि लोकहित या मूल्यांकडे पुन्हा वळणे अत्यावश्यक आहे. जनता आता अधिक जागरूक झाली आहे. त्यामुळेच पत्रकारितेनेही आत्मपरीक्षण करण्याची आणि स्वतःची दिशा पुन्हा ठरवण्याची हीच योग्य वेळ आहे.
कॉमन मॅन च्या नजरेतून सारांश
“अरे, हे सगळं आम्हाला जाणवत असतं रे. जनता इतकी भोळी राहिलेली नाही. बातमी वाचली की कळतं, ही सत्यासाठी आहे की तिकीटासाठी.”नाशिकमध्ये घडलेली घटना त्याचं जिवंत उदाहरण आहे. पत्रकारितेत अनेक वर्षं काम केलेले तीन पत्रकार अचानक राजकीय पक्षात उडी घेतात. लेखणी बाजूला ठेवून खुर्चीच्या शोधात धाव घेतात. प्रामाणिक पत्रकारिता सोडून गावहून आलेल्या केळीचा व्यापार सुरू करतात ((केळी हे फक्त उदाहरण आहे. सद्या आंब्याचा सिझन नसल्याने केळी असा उल्लेख केला )मात्र केळीवाला जास्त हुशार ठरतो. ऐनवेळी त्यांच्या हातात गाजरे ठेवतो आणि स्वतः मात्र बाजूला होतो. अपेक्षित तिकीटाऐवजी त्यांच्या पदरी निराशाच पडतेदुसरा एक पत्रकार घड्याळाच्या काट्यावर धावत होता. वेळेच्या गणितात, राजकीय गणितात तो इतका गुंतला की शेवटी त्याच काट्याने त्याचा काटा काढला. वेळ कुणासाठी थांबत नाही आणि राजकारण तर कोणाचंच नसतं, हे सत्य त्याला उशिरा का होईना उमगलं.
कॉमन मॅन ठामपणे सांगतो—लेखणी हेच खऱ्या अर्थाने शस्त्र आहे. राजकारणी कुणाचेच नसतात, ते केवळ आपल्या फायद्याचे असतात. त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम पत्रकार करत असतो, सत्तेचा भाग होणं हे पत्रकाराचं काम नाही. पत्रकारितेचं खऱ्या अर्थाने यश म्हणजे चांगल्या व्यक्तीला पुढे आणून ‘किंग’ घडवणं—म्हणजेच किंगमेकर होणं.किंग बनायच्या नादात पत्रकारितेचा बळी दिलात, तर नाशिकच्या पत्रकारितेत तुमचं नाव किशोर, नितीन किंवा भूषणसारखं उदाहरण ठरेल (हि नावे काल्पनिक आहेत वास्तवात असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ) त्यामुळे ज्या पत्रकारांना नेते बनायचं स्वप्न पडतंय, त्यांनी जागं व्हावं. तुमचा जन्म लोकांना न्याय देण्यासाठी झालाय, खुर्चीसाठी नाही.हे बोलून कॉमन मॅन निघून जातो. कारण सत्य बोलून गेलं असतं.
(नाशिक मधील पत्रकारांना तिकीट का नाकारले याची इन साईड स्टोरी उद्याच्या अंकात वाचा)

