मुंबई, दि. १९ सप्टेंबर २०२५ – Kajalmaya Marathi Serial मराठी मनोरंजन विश्वात सातत्याने दर्जेदार मालिका सादर करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवर आता एक नवी गूढ मालिका प्रेक्षकांसमोर येत आहे. मालिकेचं नाव आहे ‘काजळमाया’. ३०० वर्षांनंतर परतलेली एका चेटकीणीची ही कथा प्रेक्षकांना रहस्य, थरार आणि अद्भुत अनुभव देणार आहे.
कथेचा गूढ प्रवास(Kajalmaya Marathi Serial)
‘काजळमाया’ ही कथा आहे पर्णिका नावाच्या चेटकीणीची, जिला चिरतरुण्याचं वरदान आहे. अपार सौंदर्य आणि तंत्रविद्येतले प्रभुत्व यामुळे ती आकर्षक तर आहेच, पण त्याचसोबत निर्दयी, स्वार्थी आणि महत्वाकांक्षीही आहे. वंशवृद्धी आणि स्वतःचं अस्तित्व अमर करण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. मात्र तिच्या महत्वाकांक्षेला जेव्हा आरुष नावाचा तरुण आव्हान देतो, तेव्हा सुरु होते एका अद्भुत संघर्षाची गोष्ट – काजळमाया.
अक्षय केळकरची नवी भूमिका
या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय केळकर आरुष वालावलकर हे प्रमुख पात्र साकारणार आहे. स्वतःच्या भूमिकेबद्दल तो म्हणतो, “स्टार प्रवाहसोबत मुख्य अभिनेता म्हणून ही माझी पहिलीच मालिका आहे. कम्फर्ट झोनच्या बाहेरचं हे पात्र आहे. आरुष कवी मनाचा, साधा, सरळ आणि कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारा आहे. तो मराठी विषयाचा प्राध्यापक असून कविता वाचनातील त्याची हातोटी विलक्षण आहे. पहिल्यांदाच गूढ मालिकेत असे पात्र साकारत असल्यामुळे मी प्रचंड उत्सुक आहे.”
स्टार प्रवाहचा नवा प्रयोग
स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे यांनी या मालिकेबद्दल सांगितलं, “गूढ आणि उत्कंठावर्धक विषय प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. ‘काजळमाया’ हा वाहिनीचा नवा प्रयोग असून प्रेक्षक नक्कीच याला पसंती देतील. नवे विषय, नवी पात्रं आणि उत्तम कलाकारांच्या साथीने ही मालिका लोकप्रियतेचे शिखर गाठेल, असा विश्वास आहे.”
लवकरच प्रेक्षकांसमोर
महाराष्ट्रातील घराघरात पोहोचणाऱ्या स्टार प्रवाहवर ही रहस्यमय मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “३०० वर्षांनंतर परतणाऱ्या काजळमायाची गोष्ट चुकवू नका,” असे आवाहन वाहिनीने केले आहे.