कविता गायधनी यांच्या ‘जिव्हाळ्याचे मेघ’ काव्यसंग्रहाचे १० डिसेंबरला प्रकाशन
ख्यातनाम कवी प्रवीण दवणे यांची लाभणार विशेष उपस्थिती
नाशिक,५ डिसेंबर २०२२- येथील कवयित्री कविता शिंगणे गायधनी यांच्या ‘जिव्हाळ्याचे मेघ’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन शनिवार दि. १० डिसेंबर २०२२ या दिवशी होणार आहे. ‘शब्दमल्हार प्रकाशन गृहा’च्यावतीने प्रसिद्ध होणाऱ्या या संग्रहाच्या प्रकाशनासाठी ख्यातनाम कवी प्रवीण दवणे येत असून त्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होईल, तर प्रमुख पाहुणे म्हणून विश्वास ठाकूर हे उपस्थित राहाणार आहेत.
नाशिकमधील प्राचीन ग्रामदैवत श्री भद्रकाली देवी हिची आरती लिहिणाऱ्या आणि ‘स्वकला’ या ग्रुपच्या माध्यमातून कविता, गाणी, ललित लेखन यांसारख्या साहित्य प्रकारांमध्ये आपले विशेष योगदान देणाऱ्या कविता गायधनी यांचा हा पहिलाच कवितासंग्रह असून पारंपरिकता आणि नवता यांचा संगम या कवितासंग्रहात वाचकांना पाहायला मिळेल.
शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी डॉ. शंकराचार्य सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल. युट्युब चॅनेलचे प्रकाशन, कवितांची गाणी हेदेखील या कार्यक्रमाचे एक वेगळे आकर्षण असून रसिकांनी प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.