मुंबई,दि. १२ एप्रिल २०२३ – ज्येष्ठ उद्योगपती आणि महिंद्रा अँड आणि महिंद्रा समुहाचे माजी अध्यक्ष केशुब महिंद्रा यांचं निधन झालं.वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी तब्बल चार दशके महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचं नेतृत्व केलं. त्यांनी अनेक सरकारी समित्यांवर कामही पाहिलं.महिंद्रा अँड आणि महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रांचे ते काका होते.
१९६३ ते २०१२ या काळात ते महिंद्रा अँड आणि महिंद्रा समुहाचे अध्यक्ष होते.२०१२ मध्ये त्यांनी सगळी सूत्र आनंद महिंद्रा यांच्याकडे सोपवली. केवळ विलीज जीप या कारची जोडणी करणारी कंपनी ही महिंद्राची ओळख त्यांनी पुसून काढली. प्रवासी वाहनं, मालवाहू वाहनं तसंच ट्रॅक्टरमध्ये महिंद्रा कंपनीला अग्रस्थानी पोहोचवण्यात केशुब यांचा सिंहाचा वाटा होता.अनेक कंपन्यांच्या बोर्डावर ते संचालकही राहिले. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, टाटा स्टील, टाटा केमिकल्स, ताज हॉटेल अशा अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी संचालक म्हणून सेवा दिली.
२०२३ च्या फोर्ब्सने जाहीर केलेल्या अरबपतींच्या यादीत केशुब महिंद्रा १६व्या स्थानी होते. फोर्ब्सच्या बिलिनिअर्स लिस्टनुसार केशुब महिंद्रा १.२ बिलियन डॉलर संपत्ती सोडून गेले आहे. केशुब महिंद्रा यांनी पेन्सिलवेनिया विद्यापीठातून पदवी मिळावल्यानंतर १९४७ सालापासून महिंद्रा ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. महिंद्रा कंपनीला अग्रस्थानी पोहोचवण्यात केशुब यांचा सिंहाचा वाटा होता. फक्त देशातच नाही तर जगभरात त्यांनी कंपनीचा विस्तार केला.
महिंद्रा अॅन्ड महिंद्रा आपल्या ट्रॅक्टरबरोर, एसयूव्ही बरोबर हॉस्पिटॅलिटी, रिअल इस्टेट आणि सॉफ्टवेअर सर्व्हिससाठी देखील ओळखले जाते. उद्योग क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल १९८७ साली त्यांना फ्रान्स सरकारच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने देखील गौरवण्यात आले. याशिवाय केशुब महिंद्रा यांना २००७ साली Ernst and Young तर्फे लाईफटाईम अचिव्हमेंट या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.केशब महिंद्र यांच्या निधनाने उद्योग जगतातून शोक व्यक्त केला जात आहे.