“कुंभमेळ्यात “हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर उखडून टाका!”-नितेश राणे

मंत्री नितेश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य

0

सोलापूर | १५ मार्च २०२६ – Kumbh Mela 2027 Nashik राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane)यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली आहे. कुंभमेळ्यात हिंदू व्यावसायिकांनीच स्टॉल लावावेत आणि इतर कोणी स्टॉल लावण्याचा प्रयत्न केला तर त्याविरोधात कठोर भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

नाशिक येथे हिंदू हित रक्षणाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या हिंदू व्यावसायिक आणि कामगारांच्या यादीचे प्रकाशन नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू खरेदी करण्याची संकल्पना मांडली.राणे म्हणाले की, “हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी केली पाहिजे, ही संकल्पना मांडणाऱ्यांचे मी स्वागत करतो. याआधी खारघरमध्येही मी अशीच भूमिका मांडली होती. त्या वेळी माध्यमांकडून माझ्यावर टीका झाली होती, मात्र मला त्याचे काहीही वाटले नाही.”त्यांनी पुढे म्हटले की, “हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंबाबत बोलायचे नसेल तर मग पाकिस्तान किंवा इस्लामाबादबद्दल बोलायचे का? आम्ही धर्मांधतेला प्रोत्साहन देतो असे आरोप केले जातात, मात्र जे टीका करतात त्यांनी प्रत्यक्ष येऊन परिस्थिती पाहावी.”

रमजानचा उल्लेख करत उपस्थित केला सवाल
राणे यांनी आपल्या भाषणात रमजान महिन्याचाही उल्लेख केला. “रमजानमध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने लागतात. त्या दुकानांमध्ये एकतरी हिंदू सापडतो का, हे दाखवून द्या,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.तसेच त्यांनी असेही सांगितले की, काही धार्मिक ग्रंथांमध्ये काफिरांकडून व्यवहार न करण्याचा उल्लेख आहे, असे ते म्हणाले. “जर ते तसे वागत असतील तर आम्ही हिंदूंनीही हिंदूंकडूनच खरेदी करण्याचा निर्णय घेतला तर त्यात चुकीचे काय?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

2047 पर्यंत देशाच्या स्वरूपाबाबत चिंता व्यक्त (Kumbh Mela 2027 Nashik)
यावेळी बोलताना राणे यांनी 2047 या वर्षाचा उल्लेख करत देशाच्या भविष्यासंदर्भात चिंता व्यक्त केली. “काही लोकांना 2047 पर्यंत भारताचे स्वरूप बदलायचे आहे. त्यामुळे हिंदूंनी सजग राहण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.त्यांनी सांगितले की, “मी कुराण दोन वेळा वाचले आहे. त्यात जकात देण्याचा उल्लेख आहे आणि काहीजण त्या पैशाचा वापर जिहादसाठी करतात, असे मला वाटते. त्यामुळे समाजाने या बाबतीत विचार करणे गरजेचे आहे.”

कुंभमेळ्याच्या तयारीवरही भाष्य
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळा 2027 च्या तयारीबाबतही त्यांनी भाष्य केले. राणे म्हणाले की, “कुंभमेळ्याची कामे वेगाने सुरू आहेत. हिंदू समाजाच्या मागण्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचवू. कुंभमेळ्यात कोणत्याही प्रकारे गोंधळ होऊ नये यासाठी सर्वांनी जागरूक राहणे आवश्यक आहे.”तसेच त्यांनी सांगितले की, “त्र्यंबकेश्वरमध्ये गेलो असताना काही दुकानांवर वेगळी नावे होती, मात्र आतमध्ये इतर व्यक्ती बसलेली दिसली. त्यामुळे याबाबत पारदर्शकता असणे आवश्यक आहे.”

धर्मांतर आणि लव्ह जिहादविरोधी कायद्याचा उल्लेख
या कार्यक्रमात राणे यांनी धर्मांतरविरोधी कायद्याबाबतही भाष्य केले. “राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रात सर्वात कडक लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्याचा सरकारचा विचार आहे,” असे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, “हे सरकार हिंदू समाजाने निवडून दिले आहे. त्यामुळे समाजाच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतले जातील.”राणे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!