कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा “जनस्थान पुरस्कार” ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जाहीर 

0

नाशिक,२८ जानेवारी २०२३ –कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा सन २०२३ चा  “जनस्थान पुरस्कार” ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जाहीर करण्यात आला आहे.हा पुरस्कार येत्या १० मार्च रोजी नाशिकच्या महाकवी कालिदास कला मंदिरामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.आज सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी यंदाचा पुरस्कार घोषित केला.

ज्ञानपीठ पुरस्कार कविवर्य वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ कुसुमाग्रज प्रतिष्ठानने एक वर्षाआड गोदा गौरव आणि जनस्थान हे दोन पुरस्कार दिले जातात. यावर्षी जनस्थान पुरस्काराचे १७ वे वर्ष आहे.हा पुरस्कार येत्या १० मार्च रोजी नाशिकच्या महाकवी कालिदास कला मंदिरामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

आशा बगे या मराठी भाषेत लिहिणाऱ्या भारतीय कादंबरीकार व लेखिका आहेत. त्यांच्या भूमी या कादंबरीला २००६ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. आशा बगे यांचे बालपण नागपूर येथे गेले. त्यांचे वडील वकील होते. बगे यांचे मराठी साहित्य व संगीतात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. नोकरी न करता घरसंसार सांभाळून लेखनाचा छंद जोपासला.

आशा बगे यांच्या लेखनाची सुरुवात ‘सत्यकथे’ पासून झाली. त्यांची गाजलेली कथा ‘रुक्मिणी’ १९८० साली प्रसिद्ध झाली. मौजचे श्री. पु. भागवत व राम पटवर्धन यांनी मग आशा बगेंच्या लेखनशैलीला आकार दिला व नंतर मौज व बगे असे समीकरण जुळून गेले. मौजच्या दिवाळी अंकात नेमाने लेखन करणाऱ्या आशा बगे यांचा २०१८ सालापर्यंतचा प्रकाशित ग्रंथसंभार १३ लघुकथासंग्रह, सात कादंबऱ्या, ललितलेखांची दोन पुस्तके असा व्यापक आहे. आशा बगे यांचा ‘मारवा’ हा कथासंग्रह विशेष प्रसिद्ध आहे, तर ‘भूमी’ व ‘त्रिदल’ या कादंबऱ्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. ‘भूमी’ ला २००७ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. यात त्यांनी प्रथमच एका तमिळ मुलीचे भावविश्व रेखाटले आहे. ‘दर्पण’ हा त्यांचा गाजलेला कथासंग्रह. या पुस्तकासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार त्यांना मिळाला.

आशाताईंना संगीताची खूप आवड आहे. संगीतावर त्यांनी अनेकदा लिहिलेही आहे. त्यांच्या लेखनातसुद्धा संगीताचा संदर्भ हमखास येतोच. त्यांचे आयुष्य मोठया व एकत्रित कुटुंबात गेले. त्याहीमुळे असेल, पण अशा कुटुंबांत होणारी स्त्रियांची घुसमट अनेक कथांमधून त्यांनी समर्थपणे मांडली आहे.

यापूर्वी जनस्थान पुरस्कार विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर,इंदिरा संत,यांच्यासह मराठीतील नामवंत साहित्यिकांना प्रदान करण्यात आला आहे.मागिल हा  पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना २०२१ मध्ये देण्यात आला होता.

पुरस्काराच्या घोषणेच्या वेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांच्यासह लोकेश शेवडे. हेमंत टकले, प्रकाश होळकर,अजय निकम, विलास लोणारी, राजेंद्र डोखले आदी उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!