नाशिक शहरात बिबट्याची दहशद : गोविंदनगर आणि सावतानगर परिसरात बिबटयाचा वावर
एकाच दिवशी शहरात आढळले दोन बिबटे : परिसरातील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण (व्हिडीओ पहा)
नाशिक,दि.१७ नोहेंबर २०२३ – नाशिक शहरात एकाच दिवशी रहिवासी भागात दोन बिबटे आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. शहरातील सावतानगर व मुंबई नाका नजिकच्या गोविंदनगर भागात शुक्रवारी पहाटे नंतर बिबट्याचा वावर आढळून आल्याने यंत्रणेची धावपळ उडाली आहे. तसेच परिसरातील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. एकाच दिवशी शहरातील रहिवासी परिसरात दोन बिबटे आढळण्याची ही पहिलीच घटना आहे.
शुक्रवारी पहाटे शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सिडकोतील सावतानगर येथील संपर्क कार्यालयाच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा वावर सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.काही वेळा पूर्वी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला जेरबंद केले असून तेथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
बिबट्याला ताबडतोब वन विभागाने पिंजरा लावून जेरबंद करावे अशी मागणी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे भ्रमणध्वनीद्वारे केली होती बडगुजर हे आसाम दौऱ्यावर असून तेथून त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. सावतानगर पाठोपाठ गोविंदनगर परिसरातही बिबट्या आढळून आला.परिसरातील अशोक प्राईड इमारतीकच्या सी विंग मधील डॉ सुशील अहिरे यांच्या घरात बिबट्या शिरला आहे त्याला जेरबंद करण्यात आले असून या ठिकाणी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली आहे.
बिबट्या आढळून आल्याने नागरिक धास्तावले आहेत.हे वृत्त समजताच वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले आहेत आतापर्यंत सिडकोच्या मळे परिसरात दिसणारा बिबट्या आता थेट नागरी वस्तीत घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गोविंदनगर परीसरातील बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचार्यांना यश आले आहे.दुपारी १ वाजेच्या सुमारास गोविंदनगर जवळील अशोक प्राईड इमारतीतील बिबट्याला जेरबंद करण्यात आले. (व्हिडीओ पहा)