नाशिक,दि,९ डिसेंबर २०२३ –नाशिक तालुक्यात काही दिवसापासुन सर्वत्र बिबट्याचा वावर वाढलेला आहे. अनेक ठिकाणी बिबट्याने पशुधना सह मानवी वस्तीत प्रवेश करून नागरिकांवर हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. ग्रामीण भागात उसाच्या शेतात जास्त प्रमाणात बिबटे आढळतात .गेल्या एक महिन्यापासून माडसांगवी चारी नंबर ७ आडगाव परिसरात रात्रीच्या वेळी मुक्तपणे बिबट्या संचार करत असताना अनेकांना आढळला .
नाशिक- संभाजीनगर रस्त्यावर माडसांगवी येथे अनेकांना त्याचे दर्शन झालेआहे.आडगाव चारी नंबर ७ माडसांगवी शीव परिसरातील विष्णू रामभाऊ नवले यांच्या घरासमोर बांधलेली दोन वासरे बिबट्याने काही दिवसांपूर्वी फस्त केली .तर बाजीराव माळोदे यांच्या मालकीचे कुत्रे खाल्ले.किसन धारबळे यांच्या वासरावर देखील हल्ला केला.
या परिसरातील शेतकरी विष्णू नवले ,नितीन नवले, सुरेश देशमुख ,किसन धारबळे,सुरज धोंगडे, भूषण देशमुख आदींनी वनविभागाचे अधिकारी राजेंद्र ठाकरे यांच्याशी संपर्क साधून पिंजरा लावण्याची मागणी केली होती. दहा-बारा दिवसांपूर्वी येथे पिंजरा लावण्यात आला होता. त्यात भक्ष म्हणून कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या. आज दिनांक ९ डिसेंबर पहाटे साधारण पाच ते साडेपाच वाजता भक्षाच्या शोधात असतांना बिबट्या अलगद पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे नवले यांनी सांगितले. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली .त्यांनी मोठ्या वाहनातून बिबट्यासह पिंजरा हलविला आहे .
या ठिकाणी बिबट्यास बघण्यासाठी परिसरातील महिलांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.साधारण दोन ते तीन वय असलेला नर जातीचा बिबट्या होता असे जाणकारांनी सांगितले .या परिसरात अजूनही बिबट्या असल्याची चर्चा असून वन विभागाने पुन्हा पिंजरा लावावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.हा परिसर बिबट्याच्या दहशतीखाली असून रात्रीच्याच वेळी नव्हे तर दिवसादेखील शेतात जाणे मुश्किल झाले आहे अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.