नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या गरजा पूर्ण करू : उद्धव ठाकरे

0

नाशिक  : महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांचे संरक्षण करणारे अधिकारी तयार होतात. नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देताना अकॅडमीच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी शासनातर्फे पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलप वळसे-पाटील,  पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री  आदित्य ठाकरे, खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, सीमा हिरे, सरोज अहिरे, राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे, अपर पोलीस महासंचालक संजय कुमार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडे, अकॅडमीच्या संचालक अश्वती दोर्जे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, पोलीस अधिकाऱ्यांना बदलत्या काळात नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण गरजेचे आहे. प्रशिक्षण घेताना मानसिक स्वास्थ्य कायम राखणेदेखील महत्वाचे आहे. त्यादृष्टीने पोलीस अकॅडमीच्या निसर्गरम्य परिसरात उत्तम सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. अशा वातावरणात प्रशिक्षण घेऊन बाहेर जाणारे अधिकारी राज्यातील माताभगिनींचे रक्षण करणार आहेत. अकादमीच्या गरजा पूर्ण करण्याच्यादृष्टीने येथील सुविधा व प्रशिक्षणाची माहिती घेण्यासाठी पुन्हा येथे येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, माझे राज्य पुढे कसे जाईल हा विचार करणे ही संघभावना आहे. महाराष्ट्र पोलिस दलाने अशी संघभावना कायम राखत देशात लौकिक प्रस्थापित केला आहे. आपल्या पोलिसांमध्येही क्रीडा राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकण्याची क्षमता आहे. त्यांच्या जिद्दीला दिशा देणे, सहकार्य करणे शासनाचे कर्तव्य आहे. क्रीडा स्पर्धेतील यशासाठी आवश्यक सुविधांच्या निर्मितीबाबत पोलिसांच्या असणाऱ्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील. शिस्तबद्ध संयोजनाने आणि झालेल्या कामाने आपण भरावरून गेलो, कामाच्या कौतुकासाठी शब्द नाहीत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अकादमीच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, अतिशय सुंदर परिसरात ही संस्था उभी असून इथे चांगल्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. त्याचा उपयोग प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी करून घ्यायला हवा. पोलिसांसाठीच्या सुविधांना शासनाने प्राधान्य दिले आहे. पोलीस दलात संघभावना असतेच. खेळांमुळे ही संघभावना अधिक मजबूत होते. ऑलिम्पिकनेदेखील संघभावनेचे महत्व अधोरेखित केले. त्यादृष्टीने क्रीडा सुविधांचा उपयोग चांगल्या प्रकारे होईल.

लोकशाही व्यवस्थेत कायद्याची बूज राखणारे सक्षम पोलीस दल असणे महत्त्वाचे आहे. असे सक्षम अधिकारी घडविण्यासाठी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सुविधा उपयुक्त ठरतील. पोलिसांसोबत इतरही विभागातून येणाऱ्या प्रशिक्षणार्थींनाही त्याचा उपयोग होईल. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी क्रीडा सुविधांचा उपयोग करून यश संपादन करावे, अशी  अपेक्षा पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी व्यक्त केली.

गृहमंत्री श्री. वळसे-पाटील म्हणाले, ऑलम्पिकमधील यशाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा सुविधांच्या उद्घाटन कार्यक्रमाला महत्व आहे. ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू तयार करण्याच्यादृष्टीने या सुविधांचा उपयोग होईल. आंतरराष्ट्रीय दर्जाची फायरिंग रेंज उपलब्ध झाल्याने देशपातळीवर तीचा उपयोग होईल. ‘निसर्ग’ प्रकल्पदेखील पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे.

अकॅडमीत व्यवस्थापन आणि नागरिकांशी असणाऱ्या संबंधांचेही प्रशिक्षण दिले जाते. गुन्हेगारांचे मानसशास्त्र आणि संवादाचे प्रशिक्षणही तेवढेच महत्वाचे आहे. पोलिसांककडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करताना त्यांना मिळणाऱ्या सुविधांचाही विचार करणे गरजेचे आहे. नव्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन अकादमीने नव्या तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणावर अधिक भर द्यावा, अशी सूचना यावेळी गृहमंत्री श्री. वळसे पाटील यांनी  केली.

पर्यटनमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, सर्व प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करून अकादमीने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. उत्तम क्रीडा सुविधांच्या माध्यमातून नवा इतिहास निर्माण करण्याची पायाभरणी झाली आहे. येणाऱ्या बॅचमधील प्रत्येक अधिकाऱ्यांना या सुविधांमुळे चांगल्या कामाची प्रेरणा मिळेल, असे त्यांनी सांगितले.

पोलीस महासंचालक पांडे म्हणाले,  महाराष्ट्र पोलीस अकॅडमी 115 वर्षे जुनी असून उत्तम दर्जाचे प्रशिक्षक येथे उपलब्ध आहेत. अकॅडमीत उत्तम क्रीडा सुविधा झाल्याने येथील खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आहेत. अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

प्रास्ताविकात श्री. संजय कुमार म्हणाले, कोविड परिस्थितीतही सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात आले. नैसर्गिक जलशुद्धीकरण प्रकल्प अभिनव असा आहे. प्रतिदिन 2 लाख लिटर पाण्याचा पुर्नउपयोग करणे यामुळे शक्य झाले आहे. अकादमीतर्फे ऑनलाइन प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आकादमीमध्ये विविध सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी आणि खाजगी संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.

विविध प्रकल्पांचे उद्धाटन

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस अकॅडमी परिसरातील नवनिर्मित इनडोअर कपोझिट फायरिंग रेंज, सिंथेटीक ट्रॅक, अस्ट्रोटर्फ फुटबॉल मैदान, ॲस्ट्रोटर्फ हॉकी मैदान, सिंथेटीक टॉपिंग बास्केटबॉल व व्हॉलिबॉल मैदान तसेच निसर्ग उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री महोदयांनी इतर मान्यवरांसह या सर्व प्रकल्पाची माहिती घेतली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.