ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या -जिल्हाधिकारी जलज शर्मा 

0

नाशिक, दि १९ मे,२०२४ – लोकसभा निवडणूक २०२४ साठी नाशिक जिल्ह्यातील २० दिंडोरी व २१ नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी उद्या सोमवार, २० मे रोजी मतदान होत असून मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी धावपळ टाळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मा. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी मतदारांना मतदार यादीतील नावाच्या सुलभ माहितीसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचा मदतीने आधीच मतदान केंद्राची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

पत्रकात म्हटले आहे, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत आहे किंवा कसे याबाबतच्या माहितीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी / मतदार नोंदणी अधिकारी यांचे नियंत्रण कक्ष तसेच मतदान मदत केंद्र क्रमांक १९५० येथे संपर्काची सुविधा मुख्य निवडणूक अधिकारी  यांनी उपलब्ध करून दिली आहे.

संपर्क क्रमांक १९५० येथे संपर्क केल्यानंतर मतदाराने त्यांचे पूर्वीच्या निवडणुकांमध्ये ज्या ठिकाणी मतदान केले होते किंवा सध्याच्या निवासाचा पत्ता इत्यादी तपशील सांगितल्यास सदर केंद्रावरील कर्मचारी मतदाराचे नाव शोधून देण्यासाठी अधिकची माहिती देवून सहकार्य करू शकतील.

याशिवाय भारत निवडणूक आयोगाचे मतदार पोर्टल https://voters.eci.gov.in/. वर मतदाराने प्रथम राज्याचे नाव, स्वत:चे पहिले नाव, वय किंवा जन्मतारीख व लिंग ही अनिवार्य माहिती नमूद केल्यानंतर मतदान त्याचे नाव मतदार यादीत शोधू शकतात. तसेच मतदार ओळखपत्राच्या दहा अंकी क्रमांकाच्या आधारे किंवा मतदाराच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे (सदर मोबाईल संबंधित मतदार माहितीसाठी यापूर्वी जोडलेला असेल तर) आपले नाव , मतदान केंद्र व क्रमांक शोधण्याचा पर्याय लिंकवर उपलब्ध आहे.

Voter Helpline  App (VHA) हे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून त्यामध्ये search your Name in Electoral Roll या पर्यायावर क्लिक करून त्यावर उपलब्ध होणाऱ्या चार उपपर्यायाच्या आधारे आपले नाव व मतदान केंद्र याबाबतचा तपशील मतदार शोधू शकतात. या ॲपमध्ये मतदाराला आवश्यक तपशील नमूद करून किंवा आधीच जोडलेला मोबाईल क्रमांक नमूद करून किंवा मतदान ओळखपत्राचा 10 अंकी क्रमांक नमूद करून त्याआधारे आपले नाव, मतदान केंद्र आणि अन्य तपशिल उपलब्ध होवू शकते. त्याचप्रमाणे नवीन मतदाराच्या ओळखपत्रावर असलेला QR Code स्कॅन करून मतदाराचा तपशील उपलब्ध करता येतो.

ज्या मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्यासाठी अडचण येत असतील त्यांनी वरीलपैकी कोणत्याही पर्यायाचा वापर करावा व मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करुन लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन श्री. शर्मा यांनी पत्रकात केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.