आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे : जिल्हाधिकारी जलज शर्मा  

0

नाशिक,दि,16 मार्च, 2024 – भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जाहीर करण्यात आली असून त्या अनुषंगाने देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ही लोकसभा निवडणूक भयमुक्त व पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी आज दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या आदर्श आचारसंहिता लागू होण्याच्या अनुषंगाने आयोजित सर्व संबंधित निवडणूक नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री.शर्मा बोलत होते.या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, नाशिक महानगरपालिका अतिरीक्त आयुक्त स्मिता झगडे, जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगुरुळे, तहसीलदार श्याम वाडकर यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार तंतोतंत, जबाबदारीने, गांभीर्याने व लक्षपूर्वक पार पाडावी, असे सांगून जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून 24 तासांच्या कालावधीत सर्व शासकीय इमारती, कार्यालय, परिसर, शासकीय संकेतस्थळे यावरील राजकीय पदाधिकारी यांची छायाचित्रे काढण्यात यावीत. तसेच राजकीय पक्षांशी संबंधित जाहिरात फलक, बॅनर, कोनशिला यासारखे राजकीय स्वरूपाची फलक हे आदर्श आचारसंहिता कालावधीत व्यवस्थितरीत्या झाकण्यात यावेत. तसेच याबाबतचा अहवाल आचार संहिता कक्षाकडे सादर करण्यात यावा. निवडणूक संबंधित अधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहिता, जाहिरात प्रसारणासाठी माध्यम प्रमाणिकरण समितीची परवानगी तसेच सोशल मीडियावर होणाऱ्या प्रचाराचा खर्च देखील निवडणूक खर्चात अंतर्भूत असल्याचे पत्र राजकीय पक्षांना देण्यात यावे. त्याचप्रमाणे निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे पालन होण्यावरही सर्वांनी लक्ष ठेवून त्याबाबत सूक्ष्म नियोजन करावे. त्याच प्रमाणे निवडणूक कालावधीत आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही, याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी या बैठकीत दिले.

राजकीय पक्ष प्रतिनिधींचीही बैठक
यानंतर राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या आदर्शआचार संहिता कालावधीत राजकीय पक्षांसाठी लागू असणारी माहिती देखील जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी विषद केली. तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी असलेल्या शंकांचे निरसन देखील यावेळी करण्यात आले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.