मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाली श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा

0

पंढरपूर – महाराष्ट्र राज्याच्या प्रथेप्रमाणे आज पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल आणि रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली. पंरपरेला अनुसरुन राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक लता शिंदे यांच्यासोबत महापूजा केली.आज पहाटे २ वाजून ५५ मिनिटांनी विठ्ठल रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्र्यासोबत यावेळी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील मुरली नवले आणि जिजाबाई मुरली नवले हे दाम्पत्य यावर्षीचे मानाचे वारकरी ठरले.

विशेष म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही त्यांची पहिलीचं महापूजा होती. कुटुंबातील सदस्यांसोबत त्यांनी विठुरायाची महापूजा केली. आजची महापूजा करण्यासाठी निवडणूक आयोगाने काही अटी आणि शर्तीच्या आधारावरती परवानगी दिली आहे. पंढरपूरात दाखल झाल्यानंतर त्यांनी अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे.

ज्ञानोबा-तुकोबांचा अखंड जयघोष, पाऊस वाऱ्याची झुळूक अन् शेकडो किलोमीटर चालून आलेल्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पहाटे आषाढीची विठ्ठल-रुक्मिणी महापूजा केली. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी पांडुरंगाला साकडे घातले.राज्यातील सर्वच लोक सुखी आणि समृद्ध होवो अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यानी विठ्ठलाकडे केली आहे.विठू माऊलीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी वारीतून पंढरीकडे धाव घेतली आहे. त्यांच्या विठ्ठल दर्शनाची आस आज पुर्ण झाली. इतक्या दिवस शांत असणाऱ्या पंढरपुरात आषाढीच्या निमित्ताने भक्तांचा महासागर दाखल झाला आहे.

पंढरपुरात सध्या जवळपास पाच ते सहा भाविक दाखल झालेत. त्यामुळे चंद्रभागेच्या तीरावर भक्तांचा मेळा जमला आहे. त्यांच्यासाठी सोय म्हणून प्रशासनाने ६४ एकर परिसरात राहुट्या उभारल्या आहेत. या ठिकाणी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह अशी सोय केलीय. शिवाय आषाढीच्या दिवशी कसलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अजून आठवडाभर तरी पंढरपूर भक्तांच्या वावराने असेच गजबजलेले राहणार आहे.

वारीत सहभागी झालेल्या भक्तांचे आभार मानतो. मला आज पुजा करण्याचा मला मान मिळाला. आमच्या चार पिढ्याने पुजा केली हे भाग्य सर्वांना मिळावं. पूर येऊ नये पण बळीराजा सुखी राहू दे. बळीराज्याचे संकट दूर होऊ द्या, कोरोनाचा नायनाट होऊ द्या, असं साखडं पांडूरंगाला घातल आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मीडियाशी बोलताना सांगितलं. समाजातील सर्व लोकांसाठी हे राज्य असेल. पंतप्रधानांनी सांगितले राज्यात मोठे प्रकल्प उभे करा. त्यासाठी निधी कमी पडणार नाही, आषाढी वारीचा आढावा घेतला लॉग टर्मसाठी सुधारणा व्हावी. ह्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. कायमस्वरूपी विकास करण्याच्या सूचना दिल्या आहे असंही शिंदे यांनी सांगितलं.

समाजातील प्रत्येक घटकाला विकासाचा लाभ मिळवून देणार
राज्यात कृषी, उद्योग, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रासह अन्य सर्व क्षेत्रात चांगली कामे केली जाणार असून विकासाचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शासन सर्वसामान्याचे आहे ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न राहतील, असे त्यांनी सांगितले.

राज्यात या वर्षी पावसाला उशीरा सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी व महापुराची परिस्थिती निर्माण झालेली असली तरी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. चांगला पाऊस पडल्यास चांगले पीक येऊन शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल. शासन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील १२ कोटी जनतेच्यावतीने महापूजा
राज्यात आषाढी एकादशीची वारी एक महापर्व असून या वारीला एक मोठी परंपरा लाभलेली आहे. आषाढी एकादशीला महापूजा करण्याचा सन्मान मिळाल्याने हा दिवस माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राज्यातील १२ कोटी जनतेच्यावतीने आपण ही शासकीय महापूजा केली असल्याचे सांगून त्यांनी राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

वारकरी सन्मान व एसटी मोफत पास वितरण
आजच्या शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मानाच्या वारकऱ्यांना राज्य परिवहन महामंडळाकडून वर्षभरासाठी देण्यात येणाऱ्या मोफत पासचे वितरणही श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक सुजय जाधव, उपमहाव्यवस्थापक अजित गायकवाड व विभाग नियंत्रक विलास राठोड उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री.शिंदे व मान्यवरांच्या हस्ते ‘रिंगण’ या वारी विशेषांकाचे प्रकाशन देखील या प्रसंगी करण्यात आले.

निर्मल दिंडी पुरस्कार वितरण

पंढरीची वारी ही महाराष्ट्राची प्राचीन, आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारीत सहभागी होणाऱ्या अनेक दिंड्या सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत असतात. या दिंड्यांचा आदर्श घेऊन ‘निर्मल वारी हरित वारी ‘ अभियानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवावा या उद्देशाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्यामार्फत ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार देण्यात येतो. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्री संत तुकाराम महाराज कोकण दिंडी पनवेल जिल्हा रायगड (एक लाख रुपये व सन्मानचिन्ह), द्वितीय क्रमांक – वै.ह.भ.प.भाऊसाहेब महाराज खरवळकर दिंडी, मु.पो.शेरा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर (७५ हजार व सन्मान चिन्ह) तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्री संत जगनाडे महाराज दिंडी घोटी बुद्रुक जिल्हा नाशिक (५० हजार व सन्मान चिन्ह) दिंडीला प्रदान करण्यात आले. या वेळी ‘ग्रीन बिल्डिंग’ पुरस्काराचे वितरणही करण्यात आले.

प्रारंभी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे यांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. श्री.औसेकर महाराज यांनी प्रास्ताविक केले, तर आभार समिती सदस्य प्रकाश जंजाळकर महाराज यांनी मानले.

यावेळी खासदार सर्वश्री डॉ.श्रीकांत शिंदे, बंडू जाधव, आमदार सर्वश्री दीपक केसरकर, तानाजी सावंत, दादा भुसे, संजय राठोड, शहाजीबापू पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, भरतशेठ गोगावले, रविंद्र फाटक, राणा जगजीतसिंह पाटील, माजी आमदार विजय शिवतारे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्यासह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!