महानगरी,गोरखपूर एक्सप्रेसला नांदगाव तर कामयानीला लासलगांव येथे थांबा मंजूर

१४ ऑगस्ट पासून पूर्ववत सेवा सुरू होणार-केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार

0

नाशिक – कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात रेल्वे प्रशासनाने अनेक रेल्वे गाड्यांचे थांबे रद्द केले होते. त्यात महानगरी, गोरखपूर व कामयानी एक्सप्रेस या गाड्यांचा नांदगाव व लासलगाव येथील थांबा रद्द चा देखील समावेश होता. परंतु आता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या रेल्वे गाड्यांचा नांदगांव व लासलगाव येथील थांबा मंजूर केला असून १४ऑगस्ट पासून या थांब्यांवर वरील रेल्वेसेवा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.

लोकमान्य टिळक गोरखपुर एक्सप्रेस (15017/18) व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते वाराणसी महानगरी एक्सप्रेस (22177/78) तसेच लोकमान्य टिळक टर्मिनल्स वाराणसी कामयानी एक्सप्रेस (11071/72) या रेल्वे गाड्यांचे नांदगाव व लासलगाव येथील थांबे रद्द केल्याने नियमितपणे रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी, सरकारी, निमसरकारी कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेवून कोरोना काळात नांदगाव व लासलगाव येथील रद्द करण्यात आलेले रेल्वे थांबे १४ ऑगस्ट पासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी सतत पाठपुरावा करतांना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. १४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवला जाणार असल्याचेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले आहे.

संपूर्ण भारतात कोरोना काळात विविध स्थानकांचे थांबे रद्द करण्यात आले होते. परंतु कोरोना परिस्थिती जस जशी पुर्वपदावर येत आहे व प्रवासी संख्येचा विचार करुन भारतीय रेल्वे प्रशासनाने कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या व रद्द केलेले थांबे पुन्हा पूर्ववत करण्यास सुरूवात केली आहे. नांदगाव व लासलगाव येथील रेल्वे थांबे मंजूर झाल्याने नाशिक जिल्ह्यातील निफाड, नांदगाव, लासलगाव, मनमाड यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सराकारच्या सेवा सुशासन आणि गरीबांचे कल्याण या त्रिसुत्री मुलमंत्रानुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वे सेवा अधिक सुखर केल्याबद्दल डॉ. भारती पवार यांनी आभार मानले. पुर्ववत रेल्वे सेवेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी नियमित संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहनही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!