मुंबई, २५ जुलै २०२५ – Maharashtra Heavy Rain Alert महाराष्ट्रात सध्या मान्सूनचा जबरदस्त जोर पाहायला मिळत आहे. राज्याच्या अनेक भागांत गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाने जोर धरला असून, यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर सखल भागांमध्ये पाणी साचण्याचे प्रकार दिसून येत आहेत. हवामान खात्याने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट तर रायगड, गोंदिया, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
🌧️ मुंबईत मुसळधार पाऊस, वाहतूक विस्कळीत ( Maharashtra Heavy Rain Alert)
मुंबई शहरात काल रात्रीपासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली असून, कांदिवली, अंधेरी, मालाड, जुईनगर, बेलापूर, वाशी या भागांमध्ये जोरदार सरी सुरू आहेत. विलेपार्ले ब्रिज परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. महापालिकेच्या पथकांनी पंपिंग मशीनच्या सहाय्याने पाणी काढण्यास सुरुवात केली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम द्रुतगती मार्ग, वांद्रे, सांताक्रुज, दहिसर आणि इतर उपनगरांमध्येही पावसाचा जोर कायम आहे.
#WATCH | Maharashtra: Underpass closed due to waterlogging seen as heavy rain lashes Mumbai. Visuals from Andheri East. pic.twitter.com/rEUmiX9iSO
— ANI (@ANI) July 25, 2025
🌊 समुद्राला मोठी भरती; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मुंबई महापालिकेच्या भरती-ओहोटी वेळापत्रकानुसार, आज दुपारी १२.४० वाजता ४.६६ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. उद्या म्हणजे २६ जुलै रोजी ४.६७ मीटर उंचीच्या लाटांची शक्यता असल्याने नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
🚧 रायगड जिल्हा रेड अलर्टवर, माळशेज घाटात धुके आणि धोका
रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे नद्या ओसंडून वाहत असून, पूरस्थितीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. माळशेज घाटात धुक्यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. घाटातील रस्त्यांवर रिफ्लेक्टर व संरक्षक भिंती बसवाव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
🌧️ विदर्भात रेड अलर्ट; अनेक भागांत संपर्क तुटला
गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी असून, नागपूर, वर्धा, अमरावती येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. भामरागड तालुक्यातील १०० पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटलेला असून, पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. गोंदियामध्ये वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजची गेट्स उघडण्यात आली असून, धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात आहे.
🚨 शाळांना सुट्टी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आलापल्ली येथील १७ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत असल्यामुळे नागरिकांना नदीकाठच्या भागांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
25 July, पुढचे काही तास कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. मराठवाडा मध्यम ते जोरदार काही ठिकाणी.
मुंबई ठाणे मुसळधार ते अतिमुसळधार ची शक्यता. दुपारी 12.40 ला समुद्रात 4.66 मी. ची भरती. कृपया काळजी घ्यावी. pic.twitter.com/S1EKjt1lY0— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 25, 2025
🚗 ठाणे आणि उपनगरांत वाहतूक कोंडी
ठाणे, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, बोरिवली आणि इतर उपनगरांमध्ये पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, विशेषतः ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
📢 प्रशासनाची नागरिकांना सूचना
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज व रेड अलर्ट लागू असल्याने प्रशासनाने नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक प्रवास टाळावा, सार्वजनिक वाहतूक वापरावी आणि प्रशासनाच्या आपत्कालीन सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे.
📸 सध्याची स्थिती (Live Updates):
मुंबई: ऑरेंज अलर्ट, भरतीसाठी सतर्कता
रायगड: रेड अलर्ट, घाटात धुके
विदर्भ: अनेक जिल्ह्यांत रेड अलर्ट, पूरस्थितीची शक्यता
गोंदिया: पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटलेले
गडचिरोली: शाळांना सुट्टी, पूरजन्य परिस्थिती