निवासी डॉक्टरांपाठोपाठ राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन 

0

मुंबई,दि,६ फेब्रुवारी २०२४ – येणाऱ्या  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मतदारांना खूष करण्यासाठी वेगवेगळ्या योजना पूर्ण करत आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा विषय, दुसरीकडे निवासी डॉक्टरांच्या मागण्या आणि त्यात आता शिक्षकेतर कर्मचारीही संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यात सरकारची सर्व बाजूने कोंडी होताना दिसत आहे.

शालेय शिक्षण मंत्री दिलीप केसरकर यांनी कोकणातील सावंतवाडीमध्ये झालेल्या अधिवेशनात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलं होतं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या अधिवेशनात केसरकर यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आठ दिवसात सोडवू, असं म्हटलं होतं. मात्र हे आश्वासन आठ दिवस उलटून गेल्यानंतरही पूर्ण न झाल्यामुळे राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी संपावर जाणार आहे. पुण्यात १२ फेब्रुवारीला ते मोर्चा काढणार आहे. त्यानंतर २० फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करणार आहेत.

तर निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. प्रलंबित मागण्या पूर्ण होत नाही म्हणून डॉक्टरांनी संप पुकारला आहे. निवासी डॉक्टरांचा संप मोडून काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठक घेतली होती. पण ही बैठक निष्फळ ठरल्यामुळे निवासी डॉक्टर संपावर जाण्याबाबत ठाम आहेत. बुधवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. मात्र आपत्कालीन सेवा संपादरम्यानही सुरु राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.